

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सातपूर परिसरातील सावरकरनगर भागात कावीळसदृश रुग्ण आढळून आल्याने महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने संबंधित परिसरात घरोघरी सर्वेक्षण सुरू केले असून, आतापर्यंत १,२७६ घरांतील ६,५८३ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
सर्वेक्षणादरम्यान एका इमारतीत कावीळसदृश आजाराचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. या सहाही रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, ते पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, संबंधित इमारतीच्या पाण्याच्या टाकीजवळ जुनी ड्रेनेज पाइपलाइन आढळून आली. त्यामुळे ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने संबंधित पाण्याची टाकी तसेच संशयित रुग्णांच्या घरांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. प्राप्त अहवालानुसार महानगरपालिकेच्या नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा पिण्यास योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित इमारतीतील पाण्याची टाकी दुरुस्त होईपर्यंत तिचे पाणी पिण्यास मनाई करण्यात आली आहे. टाकीचे कनेक्शन बंद करून महापालिकेच्या नळाद्वारे उपलब्ध होणारे पाणी वापरण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. तसेच परिसरात आरोग्य विभागाच्या पथकाकडून सर्वेक्षण व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत.
नागरिकांनी घ्यावी काळजी
पावसाळी वातावरण आणि विषाणूजन्य कावीळच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता, काळजी घेण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. पिण्यासाठी उकळून थंड केलेले किंवा सुरक्षित पाणी वापरणे, पाण्याच्या टाक्या नियमित स्वच्छ व निर्जंतुक करणे, अन्न तयार करण्यापूर्वी तसेच जेवणापूर्वी आणि शौचाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुणे, उघड्यावरील अथवा अस्वच्छ अन्नपदार्थ टाळणे आणि फळे-भाज्या स्वच्छ पाण्याने धुण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सुरक्षित पाणी, स्वच्छ हात आणि स्वच्छ अन्न हे विषाणूजन्य कावीळ प्रतिबंधाचे प्रमुख उपाय आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे."
— डॉ. प्रशांत शोटे, प्रभारी मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
कावीळ टाळण्यासाठी...
उकळून थंड केलेले किंवा सुरक्षित पाणी प्यावे.
पाण्याच्या टाक्या नियमित स्वच्छ व निर्जंतुक कराव्यात.
जेवणापूर्वी व शौचालयानंतर हात साबणाने धुवावेत.
उघड्यावरील व अस्वच्छ अन्नपदार्थ टाळावेत.
फळे व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवाव्यात.
पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळणार नाही, याची दक्षता घ्यावी.
ताप, उलट्या किंवा डोळे-त्वचा पिवळसर झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.