

नाशिक : राज्यातील जलजीवन मिशन अंतर्गत १८ हजार योजनांना सुधारित मान्यता देण्यात आली असून, यात जिल्ह्यातील १३ योजनांचा समावेश आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत १३ योजनांचा तब्बल ६0९.४७ कोटींचा भार तिजोरीवर पडला आहे. यात नांदगाव, निफाड, येवला व सुरगाणा तालुक्यांतील योजनांचा समावेश आहे. जीएसटीमध्ये झालेली वाढ, दर सूचीत झालेला बदल आणि महत्त्वाचे म्हणजे योजनेची आखणी करताना राहिलेल्या त्रुटी यामुळे ही सुधारित मान्यता देण्याची नामुष्की आली आहे.
जलजीवन मिशन योजना २0१९ पासून सुरू झाली आहे. यात ग्रामीण भागातील कुटुंबांना प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी नळाने दिले जाणार आहे. या योजनेतून जिल्ह्यात १,२२२ योजनांचे काम सुरू आहे. त्यासाठी १,४४0 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. यात ६८१ योजना रेट्रोफिटिंग असून त्याकरिता ७१२.२९ कोटी, तर ५४१ नवीन योजनांसाठी ६९७.७२ कोटींचा निधी मंजूर आहे. आतापर्यंत यातील ८0४ योजना सुरू झाल्या असून, यातील ७५0 योजनांपासून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मंजूर योजनांमधील सुमारे ५00 योजना या योजनेतील विविध तांत्रिक बदलांमुळे सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी दाखल झाल्या आहेत. यातील पहिल्या टप्प्यात १३ योजनांना मंजुरी मिळाली आहे. यात सर्वाधिक निफाड तालुक्यातील ८ योजना, येवला तालुक्यातील २, नांदगावमधील २, तर सुरगाणा तालुक्यातील एका योजनेचा समावेश आहे.
निफाड : खेरवाडी, पंचकेश्वर, पाचोरे वणी, रेडगाव बु., वनसगाव, सुंदरपूर
नांदगाव : कोंढार, नारायणगाव
येवला : अंदरसूल, बाळापूर
सुरगाणा : संजयनगर (ग्रा.पं. सराड)
सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार वनसगाव नळ पाणीपुरवठा योजनेसाठी मूळ ढोबळ अंदाजपत्रक १७६.२४ वरून १९९.८० लाख, वाहेगाव योजनेसाठी ३५.२८ वरून ७४.७८ लाख, खेरवाडी योजनेसाठी ७९.१९ कोटींवरून १२१.११ कोटी, पंचकेश्वर योजनेसाठी ४१.५४ कोटींवरून ७८.६८ कोटी, पाचोरे वणी योजनेसाठी ३४८.३३ कोटींवरून ३९६.७९ कोटी, रेडगाव योजनेसाठी ७0.८0 कोटींवरून १११.१६ कोटी, वाहेगाव योजनेसाठी ३५.२८ कोटींवरून ७४.७८ कोटी, अंदरसूल नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ९८.८४ वरून १९०.७६ लाख, बाळापूर नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ४९.८६ वरून ९५.२३ लाख, तर शिरवाडे वाकद नळ पाणीपुरवठा योजनेसाठी १५०.२२ वरून १९८.६१ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे.