

जळगाव जिल्ह्यात महामार्गावर लिफ्ट मागणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करून चाकूच्या धाकावर लुटणारी टोळी सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. स्वस्तात प्रवासाचे आमिष दाखवून प्रवाशांना कारमध्ये बसवायचे आणि निर्जन ठिकाणी नेऊन लुटायचे, असा या टोळीचा धोकादायक ‘मोडस ऑपरेंडी’ असल्याचे तपासात उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) या प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली सुमारे ४ लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार जप्त केली आहे.
या घटनेप्रकरणी रावेर येथील सलमान खान अमान उल्ला खान यांनी फिर्याद दिली आहे. २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ५:१५ वाजता ते अजिंठा चौफुली येथे घरी जाण्यासाठी उभे होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर (MH-43-AB-9210) कार तेथे आली. कारमधील चार जणांनी “१०० रुपयांत रावेरला सोडतो” असे सांगून सलमान यांना गाडीत बसवले.
काही अंतर गेल्यानंतर चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने सलमान यांच्या कमरेला चाकू लावला, तर मागे बसलेल्या दोघांनी त्यांचे हात पकडले. जबरदस्तीने त्यांच्या खिशातील ९७०० रुपये काढून घेत त्यांना कारबाहेर फेकून देण्यात आले. या प्रकरणी तक्रार दाखल होताच एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तपास वेगाने करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शरद बागल आणि त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे कारचा माग काढला.
या कारचा चालक शंभू ऊर्फ ‘पप्पू’ सुभाष पाटील (रा. केदार नगर, पिंप्राळा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त केली असून उर्वरित तीन साथीदारांची नावेही निष्पन्न झाली आहेत. हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचा शोध सुरू आहे. लवकरच संपूर्ण टोळी गजाआड होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि डीवायएसपी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत समन्वयाने ही मोहीम पार पाडली. पुढील तपास पीएसआय मोहम्मद अली सैय्यद करत आहेत.
दरम्यान, महामार्गावर अनोळखी व्यक्तींकडून स्वस्तात लिफ्ट देण्याचे आमिष दाखवले जात असल्यास नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. प्रवासासाठी अधिकृत व विश्वासार्ह वाहतुकीचा वापर करावा, अशीही सूचना देण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवली आहे.