

नाशिक : प्राकृत, संस्कृत तसेच जैन भाषेचे धडे जैन विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी जैन आर्थिक विकास महामंडळातर्फे जैन विद्यार्थी, युवक - युवतींना पाठशाळेत भाषांचे धडे दिले जाणार असून, त्यासाठी पाठशाळांचे सक्षमीकरण करण्यात येईल अशी माहिती जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली आहे.
भगवान महावीर स्वामी यांच्या 2550 व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त शासनातर्फे राज्यभरातील शाळांमध्ये 'भगवान महावीरांचे विचार' या विषयावर घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी ललित गांधी नाशिकमध्ये आले असता, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
ललित गांधी म्हणाले की, पाठशाळांचे सक्षमीकरण करताना जैन समाजाच्या प्राचीन ग्रंथसंपदेचा मराठी भाषेत प्रचार, प्रसार व्हावा यासाठी जैन मराठी विश्वकोशनिर्मितीवर काम सुरू आहे. आगामी तीन वर्षांत विश्वकोश प्रसिद्ध करण्यात येईल. याचबरोबर जैन साधू पायी विहार करताना त्यांच्या निवासाची व्यवस्था, धार्मिक पाठशाळांचे सक्षमीकरण, महिला व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्राकृत, संस्कृत आणि इंग्रजी भाषांची शिकवण आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे अशीही माहिती ललित गांधी यांनी दिली.
महामंडळाने कर्जपुरवठ्यासाठी 200 कोटींचा निधी आरक्षित केला आहे. मंडळातर्फे वैयक्तिक स्तरावर 30 लाख, तर महिला बचतगटांसाठी 50 लाखांचे कर्ज 3 ते 6 टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्यात येईल. 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्जवाटप करण्यात येईल. व्यापार व गृहकर्जावर सबसिडी देण्यात येईल. सद्यस्थितीत राज्यातील 36 जिल्ह्यांत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयातूनच जैन महामंडळाचे कामकाज सुरू राहील. सध्या मौलाना आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अल्पसंख्याक गटात जैन समाजाला केवळ 2 टक्के लाभ मिळत आहे. हा लाभ अत्यंत नगण्य स्वरूपात असल्याने समाज विकासापासून दूर जात आहे. समाजात दारिद्र्यरेषेखालील 22 लाख लोकसंख्या असल्याने त्यांना आर्थिकसाहाय्य मिळण्यास मदत होणार आहे.