

नाशिक : शहरातील वाहनतळांच्या दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नाशिक महापालिका आता सर्वंकष पार्किंग धोरण आखत आहे. इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन अॅण्ड डेव्हलपमेंट पॉलिसी (आयटीडीपी) या संस्थेमार्फत यासंदर्भातील अहवाल लवकरच महापालिका आयुक्तांना सादर केला जाणार आहे. नागरिक, पोलिस, वाहतूक शाखेच्या सूचनांचा अंतर्भाव करून पार्किंग धोरणाला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
शहरात सध्या पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. मेनरोड, सराफबाजार, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, दहिपूल, शालिमार, सीबीएस, कॉलेजरोड, गंगापूर रोड, मुंबई नाका आदी बाजारपेठांच्या भागात वाहनतळांची सुविधा नसल्यामुळे रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी केली जाणारी वाहने वाहतूककोंडीचे कारण ठरत आहेत. वाहतुकीला कुठलीही शिस्त नाही. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईलादेखील मर्यादा येत आहेत. यातून भविष्यात वाहतूक कोडींची समस्या अधिकच उग्रस्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात वाहनतळांचा अभाव, वाहतूक कोंडीचा हा जाच अधिकच भेडसावणार आहे. त्यामुळे शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करताना पार्किंग धोरणाची आखणीही महापालिकेने हाती घेतली आहे. त्यासाठी सल्लागार म्हणून आयटीडीपी या संस्थेची नियुक्ती झाली आहे.
‘आयटीडीपी’ने 2013 मध्ये नाशिकचा वाहतूक आराखडा तयार केला होता, सध्या ही संस्था पुणे, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रमुख महापालिकांना वाहतूक विषयक तांत्रिक सल्ला देते. त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी तयार केलेल्या पार्किंग धोरणाच्या धर्तीवर नाशिक महापालिकेचे धोरण तयार केले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या पथकाने नुकतीच पिंपरी-चिंचवडला भेट देऊन वाहतूक नियोजनाचा अभ्यास केला आहे.
रस्त्यावर अनेक वर्षे बंद असलेली वाहने टोइंग करून हलविण्यात येतील. विकास आणि सुविधांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर पार्किंग प्लाझा उभारण्यात येईल. यासाठी मुंबई महापालिकेने उभारलेले पार्किंग प्लाझा धोरण इतर महापालिकांनी स्वीकारावे, असे राज्याचे परिवहनमंत्री सरनाईक यांचे आदेश आहेत. त्यानुसार पार्किंग प्लाझा धोरणाचा समावेशही पालिकेच्या नव्या धोरणात केला जाणार आहे.
‘आयटीडीपी’मार्फत पार्किंग धोरणाचे प्रारूप तयार झाल्यानंतर ते नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर केले जाईल. त्यावर हरकती व सूचना मागविल्या जातील. पोलिस व वाहतूक शाखेच्या सूचनांचाही अंतर्भाव करून पार्किंग धोरण अंतिम करण्यात येईल.
रवींद्र बागूल, कार्यकारी अभियंता, ट्रॅफिक सेल, महापालिका