

नाशिक : सतीष डोंगरे
शहरात निमा इंडेक्स हे औदयोगिक प्रदर्शन होत आहे. यानिमित्त नाशिकमधील माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योगाच्या विकासाचा आढावा घेणारा हा विशेष लेख...
आकडे बोलतात
नाशिकमधील आयटी कंपन्याची संख्या : ३०० पेक्षा जास्त
आयटीमधील एकूण गुंतवणूक : साधारण २००० कोटी रुपये
आयटीत प्रत्यक्ष काम करणाऱ्यांची संख्या : १० हजार
अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती : १ लाख
नाशिकमध्ये आयटी हब प्रस्तावित असला तरी प्रत्यक्षात शहर परिसरातील आयटी कंपन्यांची संख्या ३००च्या पुढे गेली आहे. नाशिकमधून विमानसेवा सुरू झाल्याने आणि हैदराबाद, बंगळुरूसारखी आयटी शहरे नाशिकशी थेट कनेक्ट झाली आहेत. त्यामुळे नाशिकच्या आयटी उद्योगाला प्रचंड चालना मिळाली आहे. आयटी हबसाठी आवश्यक भौगोलिक परिस्थिती नाशिकला लाभली आहे. चांगली जमीन, नैसर्गिक साधनसंपत्ती, मुबलक पाणी, संगणक वापरातून होणारे कार्बन उत्सर्जन रोखणारी हिरवीगर्द वनराई, कुशल मनुष्यबळ, आल्हाददायक हवामान आदी बाबी नाशकात उपलब्ध आहे. नाशिकमध्ये वीज पुरवठाही उत्तम आहे.
बंगळुरु, हैदराबाद आणि पुण्यातील हिंजेवाडी पाठोपाठ नाशिकही आयटी डेस्टिनेशनसाठी सज्ज आहे. नाशिकमध्ये आयटी हे गुंतवणुकीचे एक चांगले क्षेत्र आहे. नाशिकमध्ये इएसडीएस, डब्ल्यूएनएस, इल्युमिनस, ट्रायकॉम, ॲरेस सॉफ्टवेअर, डेटामॅटीक्स, विनजित, नेटविन, प्रोथिओस आणि अनंत अक्सेस या मोठ्या आयटी कंपन्या नाशकात कार्यरत आहेत.
विनजित : सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, टेस्टिंग, टॅली कस्टमायझेशन आदी कामे ही कंपनी करते. जगातील इन्फोटेन्मेंट क्षेत्रातील पहिल्या ३० कंपन्यांमध्ये विजनितचा समावेश आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील या कंपनीने ११०० हून अधिक जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.
इएसडीएस : सॉफ्टवेअर सोल्युशन्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, मॅनेज्ड सर्व्हर होस्टिंग आणि त्यासाठी पूरक सेवा पुरविणारी 'इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड' ही आघाडीची कंपनी आहे. या सेवा भारत, इंग्लंड आणि अमेरिकेसह जगभरातील कंपन्या, संस्था आणि ग्राहकांना पुरविल्या जातात. या कंपनीने ५०० हून अधिक जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.
प्रोथिओस : न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरसह जगभरातील विविध वैशिष्ट्यपूर्ण आणि नामांकित बिल्डींगचे आर्किटेक्ट, कन्सल्टींग, थ्रीडी डिझाइन्स, मटेरिअल फेब्रिकेशन आदि कामे ही कंपनी करते.
डाटामॅटिक्स, डब्ल्यूएनएस : अमेरिकेसह परदेशातील विविध कंपन्या आणि संस्थांच्या बहुविध डाटा एण्ट्रीची सुविधा या कंपन्या देतात. बिलींगसह विविध प्रकारचा डाटा एण्ट्री करुन तो परदेशात उपलब्ध करुन दिला जातो.
खांडबहाले डॉट कॉम : इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, तमिळी, पंजाबी, संस्कृत, कानडी, मल्याळी, बंगाली, तेलगू अशा सुमारे १२ भाषांमधील डिक्शनरीची निर्मिती. मोफत उपलब्ध असलेल्या या डिक्शनरीचा जगभरातील नेटकर सहज वापर करतात.
नाशिकमधून विमानसेवा सुरू झाल्याने आणि हैदराबाद, बंगळुरूसारखी आयटी शहरे नाशिकशी थेट कनेक्ट झाली आहेत. त्यामुळे नाशिकच्या आयटी उद्योगाला प्रचंड चालना मिळाली आहे.
निखिल पांचाळ, - मानद सचिव, निमा, नाशिक.