

नाशिक : विकास गामणे
डिजिटल इंडिया म्हणून भारताची ओळख सर्वदूर पोहोचत असताना आजही बालविवाह रोखण्यात सरकारी यंत्रणा, सामाजिक व्यवस्थेला अपयश येत आहे. खेळत्या वयात विवाह लावून देऊन संसाराचा गाडा हाकण्याची वेळ चिमुकल्यांवर आल्याचे वारंवार अधोरेखित होत आहे.
नाशिक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या बालविवाह प्रतिबंधात्मक धडक मोहिमेअंतर्गत जिल्हा प्रशासनाने वर्षभरात 63 बालविवाह रोखण्यात यश मिळविले आहे. यात समुपदेशनाने तब्बल 43 विवाह रोखले आहे तर, 6 ठिकाणी थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जागतिक महिला दिन शनिवारी (दि.8) जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे ग्रामीण भागात बालविवाह आजही सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. विशेषतः आदिवासी, ग्रामीण भागात बालविवाहांची समस्या गंभीर बनली आहे. बालविवाह होत असल्याचे वास्तव असले तरी, समाजातील काही जागरूक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बालविवाह रोखण्यात शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांना यश मिळत आहे. गेल्या वर्षभरात महिला आणि बालविकास विभाग, पोलिस आणि चाइल्ड लाइनच्या माध्यमातून जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान जिल्हाभरात 63 बालविवाह रोखण्यात आले आहेत. बालविवाह होत असल्याबाबत विभागाकडे 70 तक्रारी प्राप्त झाल्या. यातील 7 तक्रारी खोट्या व वय पूर्ण असणे याबाबतच्या असल्याने त्या नाकारण्यात आल्या. यातील 43 बालविवाह हे समुपदेशन करून रोखले गेले आहे. सहा ठिकाणी विभागाने गुन्हे दाखल करत, कारवाईचा बडगा उगारला आहे. तर, 5 बालविवाह प्रकरणे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्याकडे कार्यवाहीसाठी सादर केले आहेत. दोन प्रकरणे इतर जिल्ह्यातील असल्याने ते त्या जिल्ह्याकडे विभागाने वर्ग केले आहेत.
नाशिक (4), पेठ (0), बागलाण (3), मालेगाव (7), चांदवड (5), इगतपुरी (4), त्र्यंबकेश्वर (4), सिन्नर (6), दिंडोरी (2), निफाड (8), येवला (9), देवळा (2), कळवण (0), नांदगाव (11) व सुरगाणा (0).
2020- 25
2021- 39
2022- 60
2023- 32
2024- 63
नाशिक जिल्ह्यात 15 तालुक्यांत ग्राम बाल सरंक्षण समिती स्थापन करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 18 ते 21 वयोगटातील मुलींच्या लग्नासाठीच मंगल कार्यालये देण्यात यावीत, अशी सक्त ताकीद देण्यात आलेली आहे. ग्रामीण भागात कुठेही बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यास 1098 या क्रमांकावर तक्रार करण्यात यावी.
सुनील दुसाने, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, नाशिक