

नाशिक : निल कुलकर्णी
नाशिकची वाटचाल वेलनेस सिटी, 'मेडिकल टूरिझम'कडे होत आहे. त्यामध्ये योग, प्राणायाम, ध्यान आदी अष्टांग योगाचे अधिष्ठान महत्वपूर्ण ठरत आहे. योग विद्याधाम आणि विपश्यना आणि हार्टफूलनेस संस्थांसारख्या संस्थांमुळेही नाशिकची ओळख वेलनेस हब, आध्यात्मिक नगरीसह 'योगनगरी' म्हणून होत आहे.
२१ जून जागतिक योग दिन म्हणून साजरा होत आहे. केंद्र सरकारचे आयुष मंत्रालयाने 'एक पृथ्वी एक आरोग्य' ही यंदाची संकल्पना जाहीर केली आहे. त्यानुसार आरोग्य आणि योग यांची सांगड घातली गेली आहे. पुराणापासून नाशिक एक आरोग्यदायी शहर म्हणून ओळखले जाते. मर्यादा पुरुषोत्तम प्रभूश्रीराम दंडकारण्य म्हणून ओळख असलेल्या याच भूमीत वनवासासाठी आले होते. गोदावरी नदीमुळे पाण्याची मुबलकता, डोंगर-दऱ्या, बाराही महिने थंड आणि आल्हाददायी हवा, भरपूर झाडी, हिरवाई यामुळे नाशिकनगरी पहिल्यापासूनच 'आरोग्य धाम' मानले जाते. ब्रिटिश काळातही इंग्रजांनी नाशिकसह देवळाली येथे आरोग्यधाम (सॅनिटेरियम्स) उभारले. गेल्या १०-१५ वर्षांपासून नाशिक आणि आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसरात वेलनेस रिसॉर्ट उभे राहीले. विशेषत: त्र्यंबकेश्वर जवळील डोंगरदऱ्यामधील निसर्गरम्य ठिकाणे,गंगापूर तसेच कश्यपी धरणाचे बॅक वाटॅर, गिरणारे, मखमलाबाद परिसरात वेलनेस रिसॉर्टची संख्या वाढली. त्यातील बहुतांश रिसॉर्ट निसर्गोपचार, आयुर्वेदिक थेरपी यावर आधारित वेलनेस हब म्हणून विकसित झाले. त्या सर्वांचा मुख्य पाया हे 'योग' हाच आहे. त्यामुळे नाशिक वेलनेस सिटी सह योगनगरी म्हणूनही नवी ओळख धारण करत आहे.
नाशिकमध्ये योग विद्याधाम मुळेही कैक वर्षांपासून योगाचा प्रचार, प्रसार सुरु आहे. योगाचार्य डॉ. विश्वासराव मंडलिक योग जीवनशैली व्हावी म्हणून महत्वपूर्ण योगदान देत आहेत.योगाचे शिक्षण देणारे शिक्षणक्रमही त्यांनी नाशिकमध्ये सुरु केले. निसर्गोपचार, आयुर्वेद उपचार पद्धतीचे असंख्य क्लिनिक शहरात आहे. त्यांना योग ही पूरक संयुक्त उपचार पद्धती ठरल्याने नाशिकची वाटचाल वेलनेस हब कडे होत गेली. त्याला योगाचेच मजबूत अधिष्ठान आहे.
त्र्यंबकरोडवरील खादी ग्रामोद्योग यांची मालकिची दीडशे एकर जागेवर आंतरराष्ट्रीय योग केंद्र सुुरु व्हावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडे केली होती. तत्कालिन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनीही यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी मदत उपलब्ध करुन देऊ अशी ग्वाही दिली होती. त्यासाठी पुन्हा पाठपुरावा करणार आहोत. त्र्यंबकेश्वर आणि लगतच्या परिसरात आध्यात्मिक ऊर्जा आणि तरंग आहेत, जिथे योग केंद्र उभारणीसाठी योग्य जागा आहे. योग हा नाशिकचे वेलनेस टुरिझमचा पाया असून त्यामुळेच वैदयकीय तसेच आरोग्य पर्यटन बहरले आहे.
किरण चव्हाण, वेलनेस रिसॉर्टचे संचालक, नाशिक.