

नाशिक : व्यापार, उद्योगांसाठी जगातील सर्वात सुरक्षित देश म्हणून पोलंडकडे बघितले जाते. त्यामुळे भारतातील व्यापारी, उद्योजकांनी पोलंडमध्ये यावे. व्यापार, उद्योग उभारावा. उच्च तंत्रज्ञान, सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पोलंडमध्ये असून, पोलंडमधून २९ युरोपियन देशांबरोबर व्यापार, उद्योग सोयीस्कररित्या करता येऊ शकतो. भारत हा व्यापार, उद्योगांसाठी सर्वांत विश्वासार्ह देश असून येथील उद्योजकांसमवेत संयुक्तरित्या व्यापार, उद्योग करण्यास आपण इच्छुक असल्याचे प्रतिपादन पोलंड-इंडिया चेंबर ऑफ को-ऑपरेशनचे उपाध्यक्ष व्हिन्सेंट पीटर यांनी केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने आयोजित केलेल्या 'निर्यात, तंत्रज्ञान हस्तांतरण, औद्योगिक भागीदारी, गुंतवणूक या क्षेत्रातील संधी' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी बोलताना व्हिन्सेंट पीटर म्हणाले, प्रशिक्षित मनुष्यबळाची पोलंडमध्ये गरज असून, पुढील काळात महाराष्ट्र चेंबर आणि पोलंड इंडिया चेंबरतर्फे व्यापार व उद्योगांसाठी संयुक्त प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे म्हणाले, द्राक्ष, कांदा, केळी व कृषी प्रक्रिया केलेले पदार्थ, भाजीपाला, फळे आदींची उत्तर महाराष्ट्रातून संपूर्ण जगात निर्यात केली जाते. प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळ, उच्च दर्जाची शिक्षण व्यवस्था, पायाभूत सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे येथील व्यापार, उद्योगात गुंतवणूक करावी. तसेच पोलंडमधील एक शहर व नाशिक या शहरांना 'सिस्टर सिटी' या संकल्पनेत आणावे, ज्यामुळे पोलंडमधील पर्यटक, उद्योजक, व्यापारी यांना भरीव मदत होईल.
स्टार्टअप समितीचे चेअरमन श्रीकांत पाटील यांनी त्यांच्या पोलंड दौऱ्याची माहिती देवून तेथील संधींबाबत सांगितले. कृषी व ग्राम विकास समितीचे चेअरमन राजाराम सांगळे यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार कार्यकारिणी सदस्य सचिन शहा यांनी मानले. याप्रसंगी पर्यटन समितीचे चेअरमन दत्ता भालेराव, माजी उपाध्यक्ष रमेश पवार, राहुल प्रधान, स्वप्निल जैन, संदीप सोमवंशी, दिपाली चांडक, मीना देशमुख, वासुदेव भगत, विजय गायकवाड, श्रीकांत पडोळ, मिलिंद राजपूत आदी उपस्थित होते.