

लासलगाव (राकेश बोरा) : भारताची फूलउद्योग निर्यात क्षेत्रातील झेप कायम आहे. कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत देशातून २१ हजार २४.४१ मेट्रिक टन फुले आणि उत्पादने निर्यात झाली असून, यातून ७४९.१७ कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला मिळाले आहे.
भारत सरकारने फूलशेतीला सूर्योदय उद्योग म्हणून ओळखले आहे आणि त्याला १०० टक्के निर्याताभिमुख असा दर्जा दिला आहे. फुलांच्या फळबागलागवडीच्या मागणीत निरंतर वाढ होत असल्याने कृषी क्षेत्रातील महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे म्हणूनच व्यावसायिक फुलशेती ग्रीन हाउसअंतर्गत हवामान नियंत्रित हाय-टेक अॅक्टिव्हिटी म्हणून उदयास आले आहे. फुलांच्या निर्यातीमध्ये गेल्या काही वर्षांपासून स्थिर वाढ दिसत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी निर्यात मूल्यामध्ये वाढ झाली असून, भारत जागतिक फूलबाजारात आपली उपस्थिती मजबूत करत आहे.
प्रमुख निर्यातक्षम फुले
गुलाब, रजनीगंधा, ग्लॅडिओलस, अँथुरियम, कार्नेशन, जासमीन, ऑर्किड, ट्यूलिप आणि झेंडू ही प्रमुख निर्यात होणारी फुले आहेत.
प्रमुख बाजारपेठा
भारतीय फुलांना सर्वाधिक मागणी अमेरिका, नेदरलँड, यूएई, यूके, जर्मनी, मलेशिया, इटली, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांकडून येते.
फूलशेतीतून ७४९ कोटींची निर्यात ही सकारात्मक बाब असली, तरी भारताचा जागतिक बाजारातील वाटा अत्यल्प आहे. शाश्वत वाढीसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र, दर्जेदार रोपे, निर्यातक्षम जाती आणि शेतकऱ्यांमध्ये जागरूकता या बाबींवर भर देणे आवश्यक आहे. फूलशेतीकडे आता गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.
सचिन होळकर, कृषितज्ज्ञ, लासलगाव, नाशिक.