

नाशिक : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या मुंबई येथील मुख्यालयाला नुकतेच व्हिएतनामचे कॉन्सुल जनरल ले क्वांग बिएन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी भारत आणि व्हिएतनाममधील दीर्घकालीन व्यावसायिक संबंध आणि गुंतवणुकीच्या संधींवर उभयतांमध्ये चर्चा झाली.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी, व्हिएतनामचे कॉन्सुल जनरल ले क्वांग बिएन यांचे स्वागत केले. देश व राज्यातील व्यापार, उद्योग, पर्यटन व कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी व्हिएतनामबरोबर संयुक्त उपक्रम राबविण्यात येईल. भारत आणि व्हिएतनाममधील व्यावसायिक सहकार्य अधिक दृढ आणि दीर्घकालीन करण्याच्या प्रयत्न केला जाईल. दोन्ही देशांमधील व्यापार, उद्योग, आर्थिक संबंधांना नवी दिशा देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर प्रयत्न करेल, असे माणगावे यांनी सांगितले. व्हिएतनामचे कॉन्सुल जनरल ले क्वांग बिएन यांनी, भारत व व्हिएतनाम दोन्ही देशांमध्ये व्यापार, उद्योग, हॉटेल आणि पर्यटन, फर्निचर उद्योग या क्षेत्रांत देवाणघेवाण आणि वाढ होण्यासाठी चेंबरच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात येतील असे सांगितले. चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी उत्तर महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राची माहिती देऊन नाशिकमध्ये भेट देण्यासाठी शिष्टमंडळाला आमंत्रण दिले. कृषी समिती चेअरमन राजाराम सांगळे यांनी राज्यातील व उत्तर महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र व कृषी प्रक्रिया उद्योगांची माहिती दिली. यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, महिला उद्योजक समितीच्या अध्यक्षा डॉ. धनश्री हरदास, आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध उपक्रमांचे नेतृत्व करणारे गगन महोत्रा आदी उपस्थित होते.
या मुद्द्यांवर केली चर्चा
हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रांतील भागीदारी करणे, रिअल इस्टेट आणि गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये गुंतवणूक, कृषी उत्पादनांची निर्यात आणि तंत्रज्ञान हस्तांतरण, फर्निचर उद्योगातील व्यापार वाढवणे. दोन्ही देशांमधील व्यावसायिक गुंतवणुकीला चालना देणे आदी मुद्द्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.