

सिन्नर (नाशिक) : ग्रामीण भागातील कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी भारतीय डाक विभागाने आर्थिक सुरक्षा चक्र हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. नाशिक विभागात प्रायोगिक स्वरूपात राबविण्यात येणार्या या उपक्रमांतर्गत शाखा डाकपाल आणि ग्रामीण डाकसेवक घराघरांत जाऊन कुटुंबांचा आर्थिक सर्व्हे करणार आहेत.
केवळ नाशिक विभागातच आर्थिक सुरक्षा चक्र उपक्रम सुरू केला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबाना योग्य आणि विेशासार्ह गुंतवणूक करण्यासाठी कर्मचारी मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक कुटुंबासाठी आणि प्रत्येकासाठी या आर्थिक सुरक्षा चक्राचा उपयोग होईल, अशी अपेक्षा आहे.
प्रफुल्ल वाणी, प्रवर डाक अधीक्षक, नाशिक विभाग
यामधून नागरिकांना पोस्ट विभागातील बचत, गुंतवणूक, विमा व पेन्शन योजनांची माहिती देत आर्थिक कवच अधिक मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे. डाक विभागाला दीडशे वर्षांची विश्वासार्ह सेवा परंपरा लाभलेली असून, आता पारंपरिक सेवांपलीकडे जाऊन संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती प्रवर डाक अधीक्षक प्रफुल्ल वाणी व सहायक अधीक्षक योगेश शिंदे यांनी दिली आहे. या उपक्रमांतर्गत बचत खाती, आर. डी., पीपीएफ, डाक जीवन विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, अटल पेन्शन योजना आदी सर्व आर्थिक साधनांची तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आर्थिकद़ृष्ट्या सक्षम होणे हा योजनेचा मुख्य गाभा असून, लवकरच डाक कर्मचारी प्रत्यक्ष भेटींद्वारे माहिती देणार आहेत. सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाने केले आहे.