Population Census 2027 | जनगणना 2027 ची तयारी सुरू! जानेवारीत नागरिकांना मिळणार ऑनलाइन स्वयं-गणनेची संधी

Population Census 2027 | जनगणनेचे काम नियोजनबद्ध आणि अचूक पद्धतीने पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती, मनुष्यबळ उपलब्धता, प्रशिक्षण आणि आवश्यक पायाभूत सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
India Census 2026
India Census 2026file photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशातील जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला वेग आला असून, यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना आवश्यक पूर्वतयारी करण्याचे निर्देश नगर परिषद प्रशासन संचालनालयाने दिले आहेत. जनगणनेचे काम नियोजनबद्ध आणि अचूक पद्धतीने पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती, मनुष्यबळ उपलब्धता, प्रशिक्षण आणि आवश्यक पायाभूत सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

India Census 2026
NMC Recruitment | नाशिक महापालिकेत 212 पदांची मेगा भरती; 9 डिसेंबर अर्जाची शेवटची तारीख

जनगणना २०२७ ही दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना पूर्ण झाली असून, दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना (पॉपुलेशन एन्युमरेशन) फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार आहे. त्यासाठी दि. ९ ते २८ जानेवारी २०२७ या कालावधीत नागरिकांना ऑनलाइन स्वयं-गणनेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

प्रत्येक महानगरपालिकेने वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती नोडल अधिकारी म्हणून करून त्यांचे नाव व संपर्क क्रमांक जिल्हा जनगणना अधिकाऱ्यांना कळवावेत. नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये मुख्याधिकारी किंवा प्रभारी अधिकारी ही जबाबदारी सांभाळतील. जिल्हाधिकारी आणि प्रमुख जनगणना अधिकाऱ्यांशी नियमित समन्वय ठेवण्याचेही निर्देश आहेत.

जनगणनेसाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांची आवश्यक संख्या निश्चित करून त्यांची नियुक्ती करावी. नियुक्त कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या कामातून कोणत्याही कारणास्तव मुक्त करू नये. तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी सभागृह, प्रोजेक्टर आणि बैठक व्यवस्थेसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणासाठी १०० टक्के उपस्थिती सुनिश्चित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

अचूक गणनेसाठी विशेष नियोजन

जनगणनेच्या कामासाठी प्रभाग, वॉर्ड आणि नगर यांच्या प्रशासकीय सीमा निश्चित करून त्यानंतर त्यामध्ये बदल करू नयेत. झोपडपट्ट्या, अनधिकृत वसाहती, बेघर नागरिक, भटके व स्थलांतरित कुटुंबे तसेच संस्थात्मक घरांची अचूक गणना करण्यासाठी विशेष नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे. बेघर लोकसंख्येच्या गणनेसाठी केलेल्या तारखेला रात्री आवश्यक व्यवस्था आणि सुरक्षा उपलब्ध करून द्यावी.

India Census 2026
NMC Recruitment | नाशिक महापालिकेत 212 पदांची मेगा भरती; 9 डिसेंबर अर्जाची शेवटची तारीख

अडथळा आणल्यास पोलिसांना पाचारण

जनगणना कर्मचाऱ्यांना कार्यालयीन जागा, फर्निचर, वीज, इंटरनेट, संगणक, साहित्य साठवणूक आणि वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. प्रगणकांच्या कामात अडथळा किंवा असहकार झाल्यास संबंधित पोलिस प्रशासन व जिल्हा जनगणना अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. जनगणना कर्मचाऱ्यांचे मानधन व भत्ते शासन निर्णयानुसार वेळेत अदा करून खर्चाचा स्वतंत्र अभिलेख ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

फसवणुकीपासून सावध राहा

नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी घंटागाडी, एफएम रेडिओ, स्थानिक केबल, होर्डिंग्ज, समाजमाध्यमे, महिला बचतगट, शाळा-महाविद्यालये आणि विविध सामाजिक संस्थांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक घराला भेट देणाऱ्या प्रगणकाकडे ओळखपत्र असणार असून, नागरिकांनी त्याची माहिती घ्यावी आणि फसवणुकीच्या घटनांपासून सावध राहावे, असेही सूचित करण्यात आले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.