

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यावरील 'कथित' अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला पसार असताना आश्रय देण्यासाठी मदत केल्याच्या आरोपवरून एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नाव गुन्ह्यात सहसंशयित म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.
शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि. ६) ही कारवाई केली. या प्रकरणाच्या पुढील तपाससाठी नाशिक पोलिसांचे विशेष पथक छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले असून, या कारवाईने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
देवळाली कॅम्प पोलिसांनी दाखल या गुन्ह्यातील संशयित निदा खान पसार असताना, एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हनिफ शेख यांनी तीला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात यापूर्वीच मतीन पटेल आणि हनिफ शेख यांचा सहसंशयित म्हणून समावेश करण्यात आला आहे.
या दोघांच्या चौकशीदरम्यान तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले. इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच मतीन पटेल यांनी निदा खान आणि तिच्या नातलगांना एका खोलीत राहण्यासाठी मदत केल्याची माहिती तपासात आणि तांत्रिक विश्लेषणातून समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानुसार पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने विशेष पथकाचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी जलील यांचे नाव या गुन्ह्यात सहसंशयित म्हणून समाविष्ट केले.
या कारवाईनंतर नाशिक पोलिसांचे विशेष पथक छत्रपती संभाजीनगरत दाखल झाले आहे. जलील यांची या संपूर्ण प्रकरणातील नक्की भूमिका काय होती, त्यांच्याविरोधात कोणते पुरावे हाती लागले आहेत आणि त्यांना चौकशीसाठी कधी बोलावले जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, या प्रकरणातील पोलिसांच्या पुढील तपासाकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी तिला का अटक केली नाही? मी नाशिकला एकदा नाही तीनदा गेलो होतो. पोलिसांनी माझा जबाब घेतला. मी मुंबईत केलेल्या भाषणात त्या मुलीबद्दल बोललेले रेकॉर्डिंग मला ऐकवण्यात आले, त्यावेळी मी त्यांना म्हटले होती, मला कशाला ऐकविता, मी तर पब्लेकशी बोललो होतो. त्यामुळे आता पोलिसांना नेमके काय निष्पन्न झाले, ते चार्जशीट पाहिल्यावर समजेल. मतीन पटेल माझा नगरसेवक आहे. नगरसेवक मला संपर्क करतात. ज्यावेळेस निदा खान आणि तिचे आई-वडील आले होते तेव्हा संपर्क झाला. मात्र मतीनला माहीत नव्हते ते कोण होते. एवढे दिवस निदा खान घरी होती. पोलिसांनी तिला का अटक केली नाही?
— इम्तियाज जलील, एमआयएम नेते
टीसीएस कंपनीत कार्यरत एका अविवाहित तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अत्याचार आणि 'कथित' धर्मांतराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित दानिश शेख याच्यावर अत्याचाराचा, तर तौसिफ अत्तर याच्यावर विनयभंगाचा आरोप आहे. निदा खानसह दानिश आणि तौसिफ यांनी पिडितेचे धर्मांतर करण्याचा 'कथित' प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. सध्या मुख्य संशयित दानिश शेख कारागृहात असून, अन्य संशयितांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.