

नाशिक : तापमानाचा वाढता पारा जिवघेणा ठरू लागल्याने शाळांच्या वेळेत बदल करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल केला आहे.
मंगळवार (दि.१५) पासूनच महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सकाळी ७.१५ ते ११.१५ या वेळेत शाळा भरविल्या जात असून विद्यार्थ्यांना उन्हाचा फटका बसू नये, यासाठी नियमित वेळेच्या एक तास आधीच शाळा सोडल्या जात आहेत.
राज्यात तापमानाचा पारा हा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने काही संघटनांनी शाळा सकाळच्या सत्रातच भरविण्याची मागणी केली होती. राज्यात अनेक ठिकाणी उष्माघाताचे रूग्ण आढळून आल्याने राज्य शासनाने महापालिका, नगरपरिषदा तसेच जिल्हा परिषदांसह खासगी शिक्षण संस्थांना सकाळ सत्रातच शाळा भरविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नाशिक महापालिकेने अंमलबजावणी सुरू केली आहे. महापालिकेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रात ८३ तर दुपारच्या सत्रात १८ शाळा भरविल्या जातात. सकाळच्या सत्रातील शाळा ७.१५ ते दुपारी १२.१५ यावेळेत भरायच्या. आता या शाळांची वेळ सकाळी ७.१५ ते ११.१५ अशी करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अनेक शाळा एकाच इमारतीत भरत असल्याने सकाळ आणि दुपार सत्रातील शाळा एकाच वेळी सकाळ सत्रात भरवली गेल्यास वर्ग खोल्या तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकणार नाहीत. त्यामुळे काही ठिकाणच्या दुपार सत्रातील शाळांच्या वेळा मात्र कायम राहणार आहेत.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सकाळच्या सत्रातील शाळा नियमित वेळेच्या एक तास आधी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नितीन पवार, उपायुक्त, शिक्षण विभाग, नाशिक.