Igatpuri Water Crisis | 38 कोटी पाणीयोजनेची पाइपलाइन गटार, नाल्यातून

Igatpuri water crisis | पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी शहरात आज स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे.
Water crisis
Water Pudhari
Published on
Updated on

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा

पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी शहरात आज स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. भावली धरण पाणीपुरवठा योजना अपूर्ण आणि सदोष ठरल्याने शहरात दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Water crisis
Nashik Kumbh Mela 2027 | नाशिक सुशोभिकरणासाठी तांत्रिक सल्लागार समिती

शहरात नगर परिषदेचा तलाव व तळेगाव डॅममधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दरवर्षी मार्च व एप्रिल महिन्यात पाणीटंचाई भासत असल्याने २०१८ मध्ये भावली धरणाचे पाणी शहरात आणण्यासाठी नगर परिषद प्रशासन आणि ३० वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या लोकप्रतीनिधींच्या प्रयत्नातून शासनाकडून ३८ कोटी रुपयांची सार्वजनिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली.

मात्र, दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असलेले पाइपलाइनचे काम तब्बल चार वर्षे रखडले. अखेर २०२२ मध्ये पाणीपुरवठा सुरू झाला; परंतु आजही शहराला नियमित पाणी मिळत नसून आठवड्यातून केवळ दोन ते तीन दिवसच पाणीपुरवठा केला जात आहे. २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देत नळ मीटर बसवण्यात आले; प्रत्यक्षात मात्र जोडण्या दिलेल्याच नाहीत. असे असतानाही मागील दोन वर्षांपासून नवीन दरपत्रकानुसार पाणीपट्टीची वसुली सुरू असल्याने नागरिकांना फसवण्याचे काम सुरू असल्याची चर्चा आहे.

संबंधित ठेकेदाराने इस्टिमेटप्रमाणे काम न करता अनेक ठिकाणी जुन्याच पाइपलाइनचा वापर केला. लोखंडी पाइपाऐवजी रबरी व प्लास्टिक पाइप वापरल्याने वारंवार पाइपलाइन फुटून पाणी वाया गेल्याचे दिसून आले आहे. प्लास्टिकचे पाइप वापरल्याने अनेक ठिकाणी लिकेज आहे, काही ठिकाणी जुन्याच पाइपलाइनला मुख्य पाइपलाइन जोडली आहे.

अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या पाइपलाइनमध्ये गटार, नाल्याचे व शौचालयाचे घाण पाणी मिसळत असून, नव्या पाइपलाइनद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. या दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहरात साथीचे रोग पसरले आहेत.

Water crisis
Nashik Crime News | गौतमऋषी प्रदक्षिणा मार्गावर महिलांना लुटणारी टोळी जेरबंद

अनेक नागरिकांना उलटी, जुलाब, अतिसारसारखे आजाराला सामोरे जावे लागत आहे. वेळीच ठेकेदाराने नाल्या, गटार व शौचालयाजवळील पाइपलाइन बदलण्यात आल्या नाही, तर नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याची नगर परिषद प्रशासन काळजी घेतील का, की फक्त पाणीपट्टी, घरपट्टी वसुली करतील, असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे

जलशुद्धीकरण केंद्रही अपूर्ण

ही संपूर्ण पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात पूर्ण झालेली नसतानाही ठेकेदाराने तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या संगनमताने संपूर्ण बिलाची वसुली केल्याचा आरोप होत आहे. तत्कालीन मुख्याधिकारी यांनी पाइपलाइन पूर्ण झाल्याचे पाहिलेच नाही. जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण असून, केवळ कागदावरच पूर्ण झाल्याचे दाखवले आहे. पाण्याचे कोणतेही शुद्धीकरण न करता शहराला पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news