नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाचा आपत्कालीन कक्ष नवीन इमारतीत स्थलातंरित केला आहे. मात्र, या ठिकाणी केसपेपर व औषध खिडक्यांबाहेर तसेच आपत्कालीन कक्षात जाण्यासाठी असलेल्या रॅम्पवर शेड नसल्याने रुग्ण व नातलग भर पावसातच उभे राहत आहेत. तसेच रुग्णालयातील कर्मचारीही पावसात भिजत रुग्णांची ने-आण करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या ठिकाणी शेड उभारण्याची मागणी होत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील पेठ, सुरगाणा, ठाणे, पालघर, जळगाव, धुळे, डहाणू येथील रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच घात-अपघात, विषबाधा किंवा अचानक तब्येत बिघडलेल्या रुग्णांनाही जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार मिळतात. त्यासाठी रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या नव्या इमारतीत आपत्कालीन कक्ष असून, तेथे उपचार केले जातात. तसेच बाह्यरुग्ण कक्षाची वेळ संपल्यानंतर या ठिकाणीच रुग्णांना केसपेपर व गोळ्या औषधे मिळतात. सध्या शहरात संततधार पाऊस सुरू असून, त्याचा फटका जिल्हा रुग्णालयातील रुग्णांनाही बसत आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले असून, आपत्कालीन कक्षाबाहेरील बाजूस शेड नसल्याने रुग्ण, नातलग व आरोग्य कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसापासून बचावासाठी कोणतीही सुविधा नसल्याने रुग्णवाहिकेतून रुग्णास बाहेर काढल्यानंतर पावसातच त्यास रुग्णालयात न्यावे लागत असल्याने रुग्ण भिजत असल्याचे चित्र आहे. हाच अनुभव केसपेपर व औषधे घेताना येतो.
रुग्णालयात सार्वजनिक शौचालय असले, तरी ते देखभालीअभावी बंद पडले आहे. तसेच कक्षांमधील स्वच्छतागृहात रुग्ण जात असल्याने त्यांच्यासमवेत असलेल्या नातलगांना स्वच्छतागृह शोधण्यासाठी बरीच पायपीट करावी लागते. अनेकदा जिल्हा रुग्णालयासमोरील हॉटेल राजदूतजवळील स्वच्छतागृहात रुग्णांच्या नातलगांना जावे लागत आहे.