

नाशिक : 'आदि कर्मयोगी अभियानां'अंतर्गत राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नाशिक जिल्ह्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत गौरविण्यात आले. आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्याने या अभियानात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी नाशिक जिल्ह्याचा सन्मान स्वीकारला. यावेळी प्रकल्प अधिकारी (नाशिक) अर्पिता ठुबे, प्रकल्प अधिकारी (कळवण) ए. के. नरेश, सहायक प्रकल्प अधिकारी हर्षवर्धन नाईक आणि जिल्हा व्यवस्थापक (पेसा) राकेश वाघ उपस्थित होते. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी केलेल्या विशेष कामगिरीबरोबरच सर्व तालुकास्तरीय गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पं) तसेच एएसएसके, आरजीएसए आणि पेसा टीम यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले. याबरोबरच जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रापंचायत प्रतिनिधी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करण्यात आली तसेच सरपंच व ग्रामपंचायत प्रतिनिधींचे विशेष आभार मानण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या एकत्रित आणि प्रामाणिक प्रयत्नांचा हा सन्मान आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन व ग्रामपंचायत यांनी एकसंघपणे कार्य केल्यानेच हा राष्ट्रीय दर्जाचा सन्मान मिळवता आला. आदिकर्मयोगी अभियानाच्या माध्यमातून पेसा क्षेत्रातील ग्रामविकासात नावीन्य, पारदर्शकता जनसहभाग यांचा नवा आदर्श नाशिक जिल्ह्याने घालून दिला आहे.
ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक