Hiraman Khoskar | होय, मागच्या वेळी चूक झाली ; आ. खोसकर यांची कबुली

प्रदेशाध्यक्ष पटोलेंविषयी नाराजीचा सूर
Hiraman Khoskar
होय, मागच्या वेळी चूक झाली ; आ. खोसकर यांची कबुलीfile photo
Published on
Updated on

नाशिक : 'दोन वर्षांपूर्वी विधान परिषद निवडणुकीत माझ्याकडून कळत-नकळत काही झाले असेल, मला माहिती नाही. मी वरिष्ठांसमोर कबूलही झालो होतो, माझी चूक झाली', असा जाहीर खुलासा आमदार हिरामण खोसकर यांनी केला आहे. यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांची मते फुटल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून फुटीर आमदारांमध्ये खोसकर यांच्या सहभागाचे आरोप झाले असता त्यांनी हा दावा खाेडून टाकताना, गत निवडणुकीत चूक झाल्याची कबुली दिली आहे.

यंदा विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन उमेदवार उभे केले होते. मात्र, तीनपैकी दोनच उमेदवारांचा विजय झाला, तर क्रॉस वोटिंगमुळे एका उमेदवाराच्या पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याची चर्चा आहे. त्यामुळे क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. क्रॉस वोटिंग केल्याबद्दल आ. खोसकर यांच्याकडेही संशयाची सुई असल्याने त्यांनी त्यांची बाजू मांडली. माझ्यावर संशय असेल, तर माझी मतपत्रिका न्यायालयाचे आदेश घेऊन तपासावी. आम्ही दोघांनी मराठीत मतदान केले आहे, त्यामुळे मतपत्रिका सापडेल, असा दावा खोसकर यांनी केला.

Hiraman Khoskar
राष्ट्रवादी (अजित पवार) कार्यकर्त्यांना मिळणार बूस्टर डोस

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत खोसकर म्हणाले, 'पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत. माझी आधी चौकशी करायला पाहिजे होती नंतर आरोप करायचे होते. जे सहा जण फुटले ते पक्षाला माहिती आहेत, तरीही कारवाई होत नाही. लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मी पक्षाचे काम केले आहे. मागच्या वेळी माझ्याकडून चूक झाली होती. त्यानंतर मी वरिष्ठांसमोर माझी चूकही कबूल केली होती. पण यावेळी मी चूक न करण्याची शपथ घेतली होती', असेही खोसकर म्हणाले.

ते सहा आमदार कोण होते?

नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबत निवडणुकीच्या दिवशी कोणी कोणाला मतदान करायचे याबाबत चर्चा झाली. माझ्यासह सात जणांना मिलिंद नार्वेकर यांना मतदान करण्यास सांगितले तर सहा जणांना शेकापचे जयंत पाटील यांना मतदान करण्यास सांगितले होते. पण आमच्यापैकी एक मत फुटले. ते मतदान कुणाचं फुटले? तसेच जयंत पाटील यांना मतदान करण्यास सांगितलेले होते त्या सहा आमदारांचे एकही मत त्यांना पडले नाही. तरीदेखील त्या सहा आमदारांवर कुठलीही कारवाई केली नाही. ते सहा आमदार कोण होते, हे त्यांना माहिती नाही का? असा सवालही खोसकर यांनी केला.

....बदनामी थांबवा

उमेदवारी कोणाला द्यायची तो अधिकार पक्षाला आहे. उमेदवारी द्यायची नसेल तर नका देऊ, मात्र बदनामी करू नका. मी अजूनही पक्षासोबत आहे. मात्र पक्षाने तिकीट दिले नाही तर मला कार्यकर्ते ठरवतील ती भूमिका घ्यावी लागेल. आता जी बदनामी चालू आहे ती पक्षश्रेष्ठींनी थांबवली पाहिजे. तसेच गेल्या पाच वर्षांत आमदारांची एक बैठकही घेतली नाही. फक्त निवडणूक आली की तुम्ही दोन दिवस बोलवायचं आणि वाऱ्यावर सोडून द्यायचं. तीच मिटिंग आधी झाली असती तर मतदानामध्ये फरक पडला असता. अनेक आमदार नाराज आहेत, अशा शब्दांत आ. खोसकर यांनी खदखद व्यक्त केली.

क्रॉस वोटिंग करणाऱ्यांमध्ये माझाही नामोल्लेख झाल्याचे ऐकल्याने आश्चर्य वाटले. वेळेप्रसंगी राजकारण सोडेन, पण गद्दारीचा डाग लागू देणार नाही. मी व माझा परिवार गेल्या ७ ते ८ दशकांपासून काँग्रेस पक्षासोबत आहे. माझ्यावरील आरोप मान्य नाही. मी क्रॉस वोटिंग केले या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहे. मी पक्षाच्या आदेशानुसार मतदान केले आहे.

-आ. शिरीष चौधरी, रावेर, जळगाव

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news