

नाशिक : मुंढेगाव येथील सेंट्रल किचनमधूनआदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट अन्न मिळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार हिरामण खोसकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या दौऱ्यातही हा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि.17) आमदार खोसकर यांनी पुन्हा केलेल्या पाहणी दौर्यात सेंट्रल किचनच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी जेवणाचा आस्वाद घेत आगामी काळात आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले जेवण मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
मुंढेगाव येथील सेंट्रल किचनप्रश्नी आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट अन्न मिळत असल्याचे आमदार हिरामण खोसकर यांच्या पाहाणीत निदर्शनास आले होते. त्यावेळी आ. हिरामण खोसकरांनी आक्रमण धोरण स्विकारले होते. यासंदर्भात त्यांनी आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांना जाब विचारत त्यांच्यासमोर सेंट्रल किचनमध्ये शिजविलेल्या निकृष्ट अन्नाचे सॅम्पल ठेवले होते. निकृष्ट जेवण मिळत असल्याचे बघून व्यथित झालेल्या आदिवासी आयुक्तांनी त्वरित चौकशीचे आदेश दिले होते. आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या नाशिक दौर्यातही याचे पडसाद उमटले होते. आ. खोसकर यांनी घेतलेल्या आक्षेपांचा अपेक्षित परिणाम दिसून आला आहे.
खडबडून जागे झालेल्या आदिवासी आयुक्तालयातील यंत्रणेने कारवाई करण्यास प्रारंभ केला. यामुळे ठेकेदाराने त्वरीत सेंट्रल किचनच्या कामकाजात सुधारणा केल्या आहेत. त्यानंतर आ. खोसकर यांनी शुक्रवारी केलेल्या तपासणीत स्वच्छता, नीटनेटकेपणा, ताजा भाजीपाला, ताजे अन्न शिजविण्याची सुरू असलेली प्रक्रिया, कच्च्या अन्नधान्याची व्यवस्थितरित्या केलेली साठवण बघून त्यांनी समाधान व्यक्त केले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मनातील जेवणाबाबतच्या शंकांचे निरसण करण्यासाठी त्यांनी स्वत: जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी पोळ्या कच्च्या असल्याने नाराजी व्यक्त केली. तरी आगामी काळात पोळ्यांमध्येही सुधारणा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंढेगाव येथील सेंट्रल किचनप्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पत्र लिहिले आहे. अधिवेशनातही याबाबत मी लक्षवेधी मांडणार आहे. आम्ही आक्रमक धोरण स्विकारल्यानंतर सेंट्रल किचनच्या कामकाजाता सुधारणा दिसून आली. निकृष्ट जेवणासाठी दोषी असलेल्या तीन अधिकार्यांच्या बदल्या करा, अशी आमची मागणी आहे.
- हिरामण खोसकर, आमदार, इगतपुरी