

नाशिक : हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्यात विरोधकांकडून फेक नरेटिव्ह प्रणाली राबवली जात आहे. पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती हा निर्णय २०२२ मध्ये घेतला गेला आणि हिंदी भाषा सक्ती विद्यमान महायुती सरकारने केली, असे खोटे विधान प्रस्थापित करत आहेत. मात्र, ज्यांच्या कार्यकाळात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतला गेला तेच खोटे बोलून निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन हिंदीभाषा सक्तीचे भांडवल करत आहेत, असा आरोप उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केला.
सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि नागरिक शिक्षक गौरव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (दि. ११) ५५ वा शिक्षक गौरव सोहळ्यात गुरुजनांचा गाैरव केल्यानंतर ते बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या समारंभात मंत्री सामंत यांच्या हस्ते २६ शिक्षक आणि एका संस्थेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके होते. उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, प्रा. सुनील कुटे, संजय करंजकर, सुरेश गायधनी, सोमनाथ मुठाळ, नागरीक शिक्षक गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. किशोर पवार, उपाध्यक्ष राजेंद्र निकम, सुरेश गायधनी, सोमनाथ मुठाळ, शिवसेना शिंदे गटाचे उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात प्रा. फडके यांनी वाचनालयाचा प्रवास आणि उपक्रमांवर प्रकाश टाकला. डॉ. पवार यांनी पुरस्कारांची भूमिका स्पष्ट केली. प्रास्ताविक राजेंद्र निकम यांनी केले. वैशाली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.
सावाना वाचनालयाची मातृसंस्था असून त्यांनी इतर ग्रंथालयांना मार्गदर्शक म्हणून पुढे यावे, अशी अपेक्षाही मंत्री सामंत यांनी व्यक्त केली. सावाना साहित्य संमेलनासाठी १० लाख रुपयांचा निधी देण्याची ग्वाही मंत्री सामंत यावेळी दिली.
लंडनमध्ये मराठी भाषा भवन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, असे सांगून मंत्री सामंत म्हणाले, पाच कोटी रुपये खर्च करून बोली लावून केवळ ब्रिटनमध्ये इमारत विकत घेतली नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने वैश्विक भाषा केंद्र करणारेही महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे.
योगेश सूर्यवंशी, अविनाश पवार, अनुराधा बस्ते, ज्योती वालझाडे, शामल पाटील, विनीत पवार, वैशाली मुळे, शीला गायधनी, संजय डेरले, कुंदा जोशी, अनुराधा नामजोशी, डॉ. नागेश्वर भदाणे, डॉ. अरुण कुमार व्दिवेदी, प्रा. सुनिता पाटील, डॉ. प्रमोद हिरे, गजानन अंभोरे, डॉ. गंधार मंडलिक, श्रीकांत गायकवाड, आनंद अत्रे, समीर कुलकर्णी, कैलास लवांड, प्रा. छाया लोखंडे, संध्या केळकर, प्रा. सोमनाथ घुले, प्रा. घनश्याम जाधव, प्रा. संध्या खेडेकर यांच्यासह निर्मल ग्राम विकास केंद्र, गोवर्धन.