

नाशिक : नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा वाद राज्याच्या विधिमंडळात पोहोचला असताना या खड्ड्यांबाबत दोन वर्षांपूर्वी माजी महापौर दशरथ पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर मंगळवारी (दि. ८) सुनावणी होत आहे.
२०२२ मधील पावसाळ्यात नाशिक शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडून दुरवस्था झाली होती. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढून नागरिकांना लहान-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागले. माजी महापौर पाटील यांनी या रस्त्यांची पाहणी करून हे रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. परंतु, या मागणीची प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे पाटील यांनी २५ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती.
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान नाशिक महापालिका स्वत:हून हजर झाली. त्यानंतर २ डिसेंबर २०२२ रोजी महापालिकेने न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करत रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे नमूद केले होते. प्रत्यक्षात रस्त्यांची दुरवस्था कायम राहिल्याने पाटील यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यासंदर्भात पाटील यांनी १८ जानेवारी २०२३ रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्रही सादर केले होते. त्यानंतर या याचिकेवर 'तारीख पे तारीख' सुरू आहे. आता या याचिकेवर येत्या ८ जुलै रोजी सुनावणी होत आहे. न्या. रेवती मोहिते-डेरे आणि नीला केदार-गोखले यांच्या पीठासमोर सुनावणी होणार असल्याची माहिती माजी महापौर पाटील यांनी दिली आहे.