

नाशिक : शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपत गावठाण भागाचा नियोजनबद्ध पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने नाशिकमधील गावठाणांना 'हेरिटेज' दर्जा देण्यासह विशेष एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) मंजूर करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचे निर्देश महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी प्रशासनाला दिले. महापालिकेच्या महासभेत गावठाणांच्या विकासासंदर्भात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
गावठाण भागातील जुन्या वास्तु, पारंपरिक रचना आणि ऐतिहासिक ठेवा जतन करताना स्थानिक नागरिकांना पुनर्विकासाची संधी मिळावी, यासाठी शासन स्तरावर विशेष धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. महापालिकेतील सुमारे ३०० प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी विधी विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला. विधीविषयक पॅनलची पुनर्रचना करून प्रकरणांच्या स्वरूपानुसार निष्णात वकिलांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच वरिष्ठ वकिलांचे मार्गदर्शन घेण्याबरोबरच 'लॉ ऑफिसर'ची तातडीने भरती करण्याचे निर्देश देण्यात आले.
ड्रेनेज सफाईनंतर रस्त्यावर काढण्यात आलेला मल-मातीचा ढिगारा आठवडाभरात उचलणे कंत्राटदारांसाठी बंधनकारक करण्यात येणार आहे. निर्धारित मुदतीत हा कचरा न उचलल्यास संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या झोपडपट्टी भागातील स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रणा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.
घरपट्टीचे सुरक्षा ऑडिट
महापालिकेच्या ऑनलाइन प्रॉपर्टी टॅक्स (घरपट्टी) प्रणालीतील सुरक्षेच्या दृष्टीने २०२२ मध्ये करण्यात आलेल्या 'सिव्हिक सर्व्हिसेस सिक्युरिटी ऑडिट' मधील शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. ओटीपी आणि लॉग प्रणालीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर निलंबनासह एफआयआर दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे.
गोदावरी स्वच्छतेसाठी ओपेक्स मॉडेल
गोदावरी स्वच्छतेसाठी स्वतंत्र डीपीआर तयार करून 'ओपेक्स मॉडेल'च्या माध्यमातून सीएसआर निधीचा प्रभावी वापर करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. नदी स्वच्छतेचे काम केवळ तात्पुरते न राहता त्यासाठी सातत्यपूर्ण व्यवस्था निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.
गोठेधारकांची विशेष बैठक
शहरातील गोठ्यांमधून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यामुळे उद्भवणाऱ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्व गोठेधारकांची विशेष बैठक घेण्यात येणार आहे. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट आणि स्वच्छतेबाबत आवश्यक उपाययोजना करण्यावर बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
आयटी विभागात तज्ज्ञांची भरती
महापालिकेच्या विविध ऑनलाइन आणि तांत्रिक प्रणालींमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करून कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी अनुभवी कॉम्प्युटर इंजिनीअर्स आणि आयटी तज्ज्ञांची तातडीने भरती करण्याचेही निर्देश देण्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या डिजिटल कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.