

नाशिक : राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस बरसत असतानाच, नाशिकमध्येही रविवारी (दि. १५) जोरदार पावसाने हजेरी लावली. अवघ्या तासाभरातच तब्बल १३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, नेहमीप्रमाणे यंदाही सराफ बाजाराची तुंबापुरी झाल्याचे दिसून आले.
शहरात अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांची मोसमातील पहिल्याच पावसाने पोरखोल केल्याचे दिसून आले. दरम्यान, जिल्ह्यात अनेक भागांतही पावसाने चांगली हजेरी लावली.
यंदा नाशिकमध्ये गेल्या ७ मे पासूनच अवकाळीने सलग हजेरी लावत शेतीपिकांसह पशुधनाचे मोठे नुकसान केले. त्यानंतर पावसाळापूर्व पावसानेही तुफान बॅटिंग केली. दरम्यान, गेल्या आठवड्यात काहीशी उसंत घेतली होती. मात्र, तीन दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दिवसभर उकाडा आणि रात्री जोरदार जलधारा असे काहीसे चित्र बघायवास मिळत आहे. रविवारी मात्र सायंकाळी पाचच्या सुमारासच पावसाने शहरात दमदार हजेरी लावली. सकाळच्या सुमारासदेखील शहरातील काही भागांमध्ये पाऊस झाला. सायंकाळी झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. शालिमार, मुंबईनाका, मेनरोड आरटीओ ऑफिस, सातपूर, महात्मानगर, कॉलेजरोड यासह उपनगरांमध्ये पाणीच पाणी झाले होते. काही भागांमध्ये तर वाहने पाण्यात निम्मी बुडाली होती. विशेषत: सराफ बाजारात दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी साचल्याचे दिसून आले. तासाभरातच सराफ बाजारासह शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाणीच पाणी होते. दुचाकी वाहने पाण्याखाली बुडाले होते. रविवार सुटीचा वार असल्याने, बाजारात शालेय साहित्य खरेदीसह इतर साहित्य खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली.
पंडित कॉलनी परिसरात डांबरीकरणाचे काम हाती घेतले होते. डांबरीकरण केल्यानंतर त्यावर बारीक कच टाकण्यात आली होती. मात्र, काम पूर्ण होत नाही, तोच पावसाने दमदार हजेरी लावल्याने, कच वाहून गेलीच शिवाय डांबरही उघडे पडले. महापालिकेने पावसाचा अंदाज घेऊन डांबरीकरणाचे काम हाती घ्यायला हवे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
पावसामुळे वाहनधारकांसह हातगाडीचालक विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. विक्रेत्यांनी हातगाडीवरील माल तत्काळ इतरत्र हलविला. तर काहींनी प्लास्टिकच्या कापडाने तो झाकण्याचा प्रयत्न केला. पावसाबरोबर वाराही असल्याने, विक्रेत्यांच्या साहित्याचे नुकसान झाले. दुसरीकडे वाहनचालकांना पावसाच्या पाण्यातून वाट शोधताना चांगलीच कसरत करावी लागली.