कळवण : कळवण शहर व परिसरात सायंकाळी सहा वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत मुसळधार पावसाने झोडपले. चणकापूर धरणात पाणीसाठा वाढल्याने चणकापूर धरणातून दहा हजार क्युसेकने गिरणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गिरणा नदीला पूर आला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच चणकापूर उजव्या कालव्यालाही ८० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.
पावसाने उन्हाळ कांद्याचे रोप खराब झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसाच्या पावसामुळे मका, सोयाबीन, भात व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन नवरात्रौत्सवात शेतकऱ्यांनी कांद्याचे उळे (रोप) टाकले होते. या पावसाने ते रोप वाया गेले आहे.
हायब्रीड अॅन्युटी अंतर्गत कोट्यवधी रूपये खर्च करून कळवण शहरातील मुख्य रस्त्याचे कॉक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. या कामात ड्रेनेज लाईन, साईट गटारी यांचे काम योग्य न झाल्याने पावसात रस्त्यावर स्विमिंग पुल होतो आणि वाहनचालक या पाण्यातून जीव मुठीत धरून वाहने चालवतात. रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे कळवण शहारच्या मुख्यरस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.