

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
डॉ. मनिषा जेजुरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेले त्यांचे पती तथा जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर यांनी जामिनासाठी नाशिक सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सोमवारी (दि. १९) सुनावणी होणार आहे.
या प्रकरणातील सहसंशयित डॉ. स्वाती चव्हाण यांना जामीन मंजूर झाल्याने डॉ. जेजुरकर यांच्या जामीन अर्जाकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. मनिषा जेजुरकर यांनी दि. ६ मार्च रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांची बहीण प्रा. रोहिणी थोरात यांच्या फिर्यादीवरून डॉ. नीलेश जेजुरकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासदरम्यान पोलिसांनी दि. १८ सप्टेंबर रोजी डॉ. नीलेश जेजुरकर यांना, तर दि. २० सप्टेंबर रोजी सहसंशयित डॉ. स्वाती चव्हाण यांना अटक झाली होती. त्यानंतर दि. २१ सप्टेंबरपासून दोन्ही नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते.
दरम्यान, डॉ. स्वाती चव्हाण यांच्या अर्जावर दि. १० ऑक्टोबर रोजी नाशिक सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. आता डॉ. जेजुरकर यांनीही जामिनासाठी न्यायालयीन प्रयत्न सुरू केले आहेत.
फॉरेंसिक अहवालाकडे लक्ष
या प्रकरणाच्या तपासात डॉ. नीलेश जेजुरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांच्या भ्रमणध्वनी संदेशांची तांत्रिक तपासणी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. या संदेशांचे तांत्रिक पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशालाकडून पोलिसांना प्राप्त होण्याच्या अपेक्षा आहे. या अहवालातील निष्कर्ष, उच्च न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणांचा परिणाम पुढील न्यायालयीन कार्यवाहीवर होऊ शकतो.