

जळगाव (पुढारी वृत्तसेवा): मध्य प्रदेशातील खरगोन येथे झालेल्या ४.५ रिक्टर स्केलच्या भूकंपाचे सौम्य धक्के हतनूर धरण परिसरासह जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये जाणवले. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या हतनूर धरणावर आजतागायत स्वतंत्र भूकंपमापक यंत्रणा कार्यान्वित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
धरणासारख्या मोठ्या प्रकल्पांवर भूकंपाची तीव्रता मोजणारी यंत्रणाच नसल्याने जलसंपदा विभागाच्या आपत्ती व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर असलेल्या हतनूर धरणावर भुसावळ, यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर आणि अमळनेर या सहा तालुक्यांतील सुमारे ४० हजार हेक्टर शेतीचे सिंचन, पिण्याचे पाणी आणि दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे भवितव्य अवलंबून आहे.
हतनूर धरण परिसर हा सातपुड्याच्या पायथ्याशी असून, मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागाला लागून आहे. मात्र, धरणावर स्वतःचे भूकंपमापक यंत्र उपलब्ध नसल्याने धक्का नेमका किती तीव्रतेचा होता, याचा अधिकृत तपशील धरण प्रशासनाकडे नसतो. परिणामी, प्रत्येकवेळी नाशिक येथील 'मेरी' संस्थेच्या नोंदीवर अवलंबून राहावे लागते.
धरणाची भिंत आणि दरवाजांवर भूकंपाच्या लहरींचा नेमका काय परिणाम होतो, हे तांत्रिकदृष्ट्या तपासण्यासाठी 'सिस्मोग्राफ' यंत्रणा अत्यंत आवश्यक असते. विशेषतः हतनूर धरणात आधीच मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असताना, अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात अचूक नोंदी नसणे धोक्याचे ठरू शकते.
याबाबत हतनूर धरचे अभियंता एम. एल. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हतनूर धरणावर भूमापन केंद्र आहे, मात्र त्यातून कोणतीही माहिती मिळत नाही, असे स्पष्ट केले. प्रशासनाकडे व संबंधित यंत्रणेकडे यंत्राची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःचे भूकंपमापक यंत्र उपलब्ध नसल्याने धक्का नेमका किती तीव्रतेचा होता, याचा अचूक तपशील मिळवण्यासाठी नाशिकच्या 'मेरी' संस्थेवर अवलंबून राहावे लागते.