हॅपी रक्षाबंधन! गर्दीने बाजार फुलले, आज दीडनंतर रक्षाबंधनाचा मुहूर्त

सराफ बाजार, एमजी रोड, सरकारवाडा, रविवार कारंजा परिसरात राख्यांनी दुकाने सजली
रक्षाबंधन
बहीण आणि भाऊरायाचा रक्षाबंधनचा सण(छाया : रुद्र फोटो)
Published on
Updated on

नाशिक : बहीण आणि भाऊरायाचा रक्षाबंधनचा सण आज सोमवारी (दि. 19) साजरा होत आहे. यानिमित्त रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि. 18) बाजारात राख्या, मिठाई, कपडे, गिफ्ट खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली पहावयास मिळाली तर सोमवारी सकाळी बसथांबा आदी ठिकाणी देखील बहिणींची माहेरी जाण्यासाठी लगबग सुरु असल्याचे चित्र दिसले.

रक्षासूत्राने मी तुला बांधते आहे असे बहीण भावाला सांगते

सराफ बाजार, एमजी रोड, सरकारवाडा, रविवार कारंजा, भद्रकाली, दूध बाजार, दहीपूल या भागांत राख्यांच्या दुकानांमध्ये राख्या खरेदीसाठी बहिणींची गर्दी दिसून आली.

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:। तेन त्वां अभिबद्धनामि रक्षे मा चल मा चल ।

अर्थात ज्या रक्षासूत्राने देवी लक्ष्मीने महान शक्तिशाली असुरांचे राजा बली यांना बांधले, त्याच रक्षासूत्राने मी तुला बांधते आहे असे बहीण भावाला सांगते अन भाऊ बहिणीला संपूर्ण जीवनभर तिचे रक्षण करण्याचे, तिला संकटकाळात मदत करण्याचे वचन देतो. भारतीय संस्कृतीत रक्षाबंधनाला आत्यंतिक महत्त्व आहे ते यामुळेच. म्हणूनच हा सण विशेष ठरतो.

आज साजर्‍या होणार्‍या नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन आणि तिसरा श्रावणी सोमवार एकाच दिवशी आल्याने राख्यांनी शहरातील बाजारपेठा, तर लाडक्या बहिणींनी बसस्टँड फुलले आहेत. सासरी नांदणार्‍या बहिणींची भाऊरायाला भेटण्यासाठी माहेरी जाण्याची आतुरता अन बाजारात राखी खरेदीसाठी धावपळ यामुळे मागील दोन दिवसांपासून शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी वाढतच आहे. भावाला राखी बांधताना नारळ भेट द्यावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात नारळही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिठाई आणि गिफ्ट घेण्यासाठीही दुकानांमध्येही मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे.

दुपारनंतर रक्षाबंधनाचा मुहूर्त

सोमवारी दुपारी दीड पर्यंत भद्राकाळ असणार आहे. त्यामुळे दुपारी दीडपर्यंत रक्षाबंधन सण वर्ज्य आहे. दुपारी दीड नंतर शुभ काल सुरू होत असल्याने त्यानंतरच रक्षाबंधन सण साजरा करावा. दुपारी दीड पासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत बहिणी भावाला राखी बांधू शकतात. सूर्यास्तानंतर राखी बांधण्याचा प्रघात नाही. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव दिवसा राखी बांधता आली नसल्यास रात्री रक्षाबंधन सण साजरा करावा.

कोण कोणाला राखी बांधू शकते?

ज्या व्यक्तीचे आपल्याला रोग, पीडा, संकट, वाईट काळ यांपासून संरक्षण करायचे आहे, अशा व्यक्तींना राखी बांधू शकतो. याशिवाय बहीण भावाला, गुरू शिष्याला, आई वडील मुलांना, देवतांना तसेच राखी बांधू शकते. ज्या मुलींना भाऊ नाही ते आपल्या वडिलांना तसेच आराध्य देवतेला राखी बांधू शकतात.

रक्षाबंधन कसे साजरे करावे?

रक्षाबंधन साजरे करताना पूजेच्या ताटात नारळ, पाण्याचा कलश, कुमकुम, अक्षता, राखी, दिवा, मिठाई घ्यावी. त्यानंतर बहिणीने भाऊरायाची कुमकुम आणि अक्षतांनी पूजा करावी. भावाला नारळ अर्पण करून उजव्या हाताच्या मनगटात रक्षासूत्र अर्थात राखी बांधावी यावेळी रक्षासूत्र मंत्र म्हणावा. त्यानंतर दिवा लावून ओवाळावे. भावाच्या रक्षणासाठी, कल्याणासाठी, भरभराटीसाठी देवाकडे प्रार्थना करावी, तर भावाने बहिणीला रक्षणाचे, संकटकाळात मदत करण्याचे वचन द्यावे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news