नववर्षाच्या शुभेच्छा 2025! संकल्प नववर्षाचा, आयुष्याचा, बदलांचा अन् सकारात्मकतेचा!

Nashik | स्वागत नववर्षाचं, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नाशिक
नववर्षात केंद्र तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजना या तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्य दिले जाईल, असे नाशिक शहरातील अधिकार्‍यांनी दै. ‘पुढारी’ला सांगितले. Pudhari News network
Published on
Updated on

नाशिक : नवा जोश, नवा उत्साह, नवे स्वप्न घेऊन मार्गक्रमण करताना आठवणींची शिदोरी सोबत घेऊन उत्साहाने सर्व जण आनंदाने नव्या वर्षाचे स्वागत करत आहे. नववर्षात संकल्प तर अनेक गोष्टींचा आहे, परंतु त्यातील काही गोष्टी प्राधान्याने करता येणार आहेत. नववर्षात केंद्र तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजना या तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्य दिले जाईल, असे शहरातील अधिकार्‍यांनी दै. ‘पुढारी’ला सांगितले.

विभागातील पाचही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जाईल. पर्यटन, उद्योग, कौशल्य- विकासावर आगामी वर्षात भर दिला जाईल. विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करताना शिक्षण आणि आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. येत्या 2027 मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरणार आहे. या कुंभमेळ्याचे सुयोग्य नियोजन करून नाशिक शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त, नाशिक

दर बारा वर्षांनी होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाची संधी शासनाने दिल्याबद्दल मी आभारी आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातून जिल्ह्याचा विकास साध्य करणे हा माझा संकल्प असेल. याशिवाय शासनाच्या माध्यमातून राबवण्यातून येणार्‍या विविध योजना प्रभावीपणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. कुटुंबीयांना निरोगी आरोग्य लाभावे यासाठीदेखील प्रयत्न करण्याबाबतचा माझा संकल्प असेल. -

जलज शर्मा, जिल्हाधिकारी. नाशिक.

कुंभमेळ्याचे सुयोग्य नियोजन करून नाशिकच्या विकासाला गती देण्यास प्राधान्य राहणार आहे. उत्तम रस्ते, शुद्ध पाणीपुरवठा, भूमिगत गटारी, पथदीप आदी पायाभूत सुविधा पुरवताना महापालिका प्रशासनाचा कारभार पारदर्शक व गतिमान करण्याकडे आपला कल असणार आहे. विशेषत: महापालिकेशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा अधिक वेगाने होण्यासाठी प्रयत्न केले जातील. नाशिकला इंदूरपेक्षा अधिक स्वच्छ शहर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.

मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका, नाशिक

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी इतर शासकीय विभागांसमवेत समन्वय साधत शहरातील वाहनतळ, अतिक्रमणे, रस्ते यांचा आढावा घेतला जाईल. तसेच आवश्यकतेनुसार सिग्नल, वाहतूक पोलिसांची नेमणूक केली जाईल. शहरात सीसीटीव्ही बसवून त्याद्वारेही शहराच्या वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच गुन्हेगारांवर कारवाई करण्याबरोबरच त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. शहरातील गुन्हेगारी ही मोडीत काढली जाणार असून, त्यासाठी पोलिस प्रशासन अधिक सक्षम करणार आहेत.

संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक शहर

जिल्ह्यात काही प्रमाणात कुपोषणाची समस्या आहे. यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमांतून कुपोषणाच्या समस्येवर मात केली जात आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा अधिकाधिक सुधारण्यासाठी 128 मॉडेल स्कूलची निर्मिती करण्यात आली. आगामी वर्षात 522 जिल्हा परिषद शाळांची मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत निवड करण्यात आली आहे. अशा एकूण 650 शाळा मॉडेल शाळा म्हणून निर्मित होणार आहेत. पेसा ग्रामपंचायतीमध्ये पेसा निधी माध्यमातून अधिकाधिक विकासकामे करण्यात येतील व भौतिक सुविधा निर्माण करण्यात येतील.

आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.

मी कर्मवादी आहे. एखादा दिवस बघणे आणि मग संकल्प करणे यापेक्षा उगवत्या सूर्याच्या साक्षीने आनंदात दिवस घालवणे, आपले काम नेटाने करणे आणि त्या कामामधून समाजाची सेवा करत राहणे असाच माझा रोज संकल्प असतो. आपल्या प्रत्येकाकडून समाजाच्या हितासाठी काहीतरी वेगळे करण्यासाठी नियतीने आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातले आहे. त्या कामासाठी संकल्प करणे यापेक्षा दररोज समाजामध्ये चांगले काम करावे, जनतेच्या प्रश्नांसाठी सजगता दाखवणे योग्य ठरते, असे मला वाटते.

लीना बनसोड, व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ

आदिवासी आश्रमशाळांमधील मुलींचे शिक्षण, सुरक्षितता आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हाच नवीन वर्षाचा संकल्प आहे. राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत 497 शासकीय आश्रमशाळा चालवल्या जातात. या आश्रमशाळांमध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अध्ययन स्तर मूल्यमापन आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या दृष्टीने विविध 22 उपक्रम हाती घेण्यात आले आहे. यातील ‘गुरुशाला’ हा उपक्रम महत्त्वाचा आहे.

नयना गुंडे, आदिवासी आयुक्त, आदिवासी विकास महामंडळ, नाशिक

चालू वर्षात जास्तीत जास्त लाचखोरांना पकडण्याचा प्रयत्न राहील. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती केली जाईल. लाचखोरांना पकडण्याबरोबरच त्यांना लवकरात लवकर शिक्षा मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच कारवायांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार असून कार्यालयीन कामकाजात संगणकीकरणाचा वापर वाढवण्यावर भर राहील.

शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

जिल्हा शासकीय रुग्णालयात क्रिटिकल केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यात रुग्णांना एकाच छताखाली सर्व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न राहतील. जेणेकरून रुग्णांना वेळेत उपचार मिळतील. त्याचप्रमाणे ‘मॅटर्नल चाइल्ड हेल्थ युनिट’ सुरू करणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाही लाभ होईल.

डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक. नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news