

नाशिक : सतीश डोंगरे
मोठमोठे खड्डे, धूळ, कच, अस्वच्छता, कचराकुंडी, मोकाट जनावरांचा उपद्रव असे चित्र हमखास बघावयास मिळणाऱ्या बसस्थानकांचे रुपडे आता पालटले आहे. राज्यातील तब्बल १९३ बसस्थानके खड्डेमुक्त झाले असून, काँक्रिटीकरण अन् सुशोभीकरणामुळे बसस्थानकांना चकाकी मिळाली आहे. 'एमआयडीसी'च्या पुढाकाराने ही किमया साधणे शक्य झाले असून, पुढील काळात एसटी गैरसोयीची नसून सोयीचे असल्याची भावना प्रवाशांमध्ये व्यक्त न झाल्यास नवलच.
ग्रामीणसह शहराची जीवनवाहिनी असलेल्या बससेवेतील मुख्य घटक असलेल्या बसस्थानकांची दुर्दशा हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. अशात महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने (एमआयडीसी) पुढे येत राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी महामंडळाबरोबर डिसेंबर 2023 मध्ये तब्बल 600 कोटींचा सामंजस्य करार केला. आजवरच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारचा प्रयोग केल्याने, उद्योग वाढीसाठी कार्यरत एमआयडीसीकडून बसस्थानकांचा कायापालट कसा केला जातो, याबाबत अनेकांना उत्सुकता होती. दरम्यान, करारानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील तब्बल 193 बसस्थानकांचे काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. राज्यात एकूण 609 बसस्थानके असून, त्यापैकी 563 बसस्थानके कार्यरत आहेत. यातील 193 बसस्थानकांचे काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आल्याने, एरवी खड्डेच खड्डे नजरेस पडणाऱ्या बसस्थानकांवर सुसज्ज असे काँक्रिटीकरण बघावयास मिळत आहे. याशिवाय स्वच्छताही नजरेस पडत आहे.
पहिल्या टप्प्यात 193 बसस्थानकाच्या काँक्रिटीकरणासाठी एमआयडीसीने 500 कोटींचा खर्च केला आहे. तर रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती यासाठी 100 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. एमआयडीसीच्या पुढाकाराने बसस्थानकांचा केलेला कायापालट, प्रवाशांसाठी सोयीचा ठरत आहे.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा, नामपूर, ताहाराबाद, पिंपळगाव आणि महामार्ग बसस्थानकाचे एमआयडीसीच्या माध्यमातून काॅक्रीटीकरण करण्यात आले. पूर्वी या बसस्थानकांवर खड्ड्यांचे साम्राज्य होते. पावसाळ्यात पाण्याचे तळे साचत होते. याशिवाय बसस्थानके चिखलमय असायचे. अस्वच्छताही प्रचंड होते. आता मात्र, या बसस्थानकांचा कायापालट झाला आहे.
एमआयडीसीच्या माध्यमातून केलेल्या काँक्रिटीकरणामुळे बसस्थानके खड्डेमुक्त झाली असून, पुढील 25 ते 30 वर्षे बसस्थानकांचे रस्ते सुसज्ज राहणार आहेत. याशिवाय बसस्थानकांवर स्वच्छता ठेवण्यासही मदत होत आहे.
अरुण सिया, विभाग नियंत्रक, राज्य मार्ग परिवहन महामंडळ
प्रवाशांसह औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या उद्योजक, कामगारांना बसस्थानके सोयीचे असावेत, या भावनेतून एमआयडीसीने पुढाकार घेत बसस्थानकांचे काँक्रिटीकरण केले. यामुळे राज्यभरातील बसस्थानके सुसज्ज झाली आहेत.
जयवंत पवार, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी