

नाशिक : रायगड व नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसताना या पदावरून आता महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा पालकमंत्रिपदावर दावा ठोकला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक सात आमदार असल्याने राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद मिळावे असा आग्रह असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले. तर दुसरीकडे शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मंत्री भुजबळ यांच्या पालकमंत्रीपदाला थेट विरोध दर्शविला आहे. महायुतीत नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. 15 ऑगस्ट रोजीच्या ध्वजारोहनाच्या निमित्ताने पालकमंत्रीपदाचा वाद उफाळून आला होता. याच मुद्यावरून नाशिकच्या रणागंणात मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री भुजबळ यांच्यात शाब्दीक वाकयुध्द रंगले होते. ध्वजारोहन झाल्यानंतर, हा वाद शमेल असे अपेक्षित वाटत असताना जळगावातही हा वाद पेटला होता.
मंत्री भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना पालकमंत्रीपदाबाबत भाष्य केले आहे. मंत्री भुजबळ म्हणाले की, मी आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगणार आहे की, रायगडमध्ये आपल्या पक्षाचा एक आमदार असताना आपण पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरतो आहे. तर, नाशिक जिल्ह्यात आपले सात आमदार आहेत, म्हणजे जिल्ह्यातील निम्मे आमदार आमच्या पक्षाचे आहेत. त्यामुळे पालकमंत्रीपद मिळावे असा आग्रह धरावा असे उपमुख्यमंत्री पवार यांना सांगणार आहे. ते बोलतील मुख्यमंत्र्यांशी, बाकी पालकमंत्री ठरविण्याचा अधिकारी हा मुख्यमंत्र्यांचा असल्याचे मंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
मंत्री भुजबळ यांच्याकडून पालकमंत्रीपदावर दावा केला जात असताना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी त्यास विरोध केला आहे. माध्यमांशी बोलतांना आ. कांदे यांनी, राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत. मात्र, यातील किती आमदार त्यांच्यासोबत आहे हे एकदा तपासून पाहा. मंत्री भुजबळांना माझा वैयक्तीक विरोध आहे. राष्ट्रवादीतील आमदारांचा तसेच भाजप आमदारांचा देखील भुजबळ यांना तीव्र विरोध असल्याचा दावा त्यांनी केला. पालकमंत्री ठरविण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे तेच ठरवतील असेही आ. कांदे यांनी स्पष्ट केले.