

नाशिक : नाशिकच्या पालमंत्रिपदावरून मंत्री गिरीश महाजन व मंत्री दादा भुसे यांच्यात मिश्किल टिप्पणीचा कलगीतुरा रंगलेला असताना मंत्री छगन भुजबळ यांनी देखील यात उडी घेत खास शैलीत मिश्किल टिप्पणी केली. भुजबळ म्हणाले की, मी काही एवढे लांब (डोनाल्ड ट्रम्पकडे) जाणार नाही. मी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जाईन. फार फार तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत जाईन, पण त्यापलीकडे नाही असे सांगितले.
मंत्री भुजबळ यांनी सोमवारी (दि.13) नाशिक येथे पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर भाष्य करत चौफेर फटकेबाजी केली. युतीचे गणित, मराठा आरक्षण, ओबीसी आंदोलन आणि ठाकरे बंधूंच्या भेटीवर त्यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली. आगामी निवडणुकांतील युतीच्या समीकरणांबद्दल बोलतांना भुजबळ म्हणाले, वर्तमानपत्रातून वाचतो की तिन्ही पक्षांची (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) युती होणार. पण वास्तव वेगळे आहे. प्रत्येक ठिकाणची स्थानिक परिस्थिती वेगळी आहे. काही ठिकाणी भाजप आणि अजित पवार गट एकत्र येतील, तर काही ठिकाणी शिंदे आणि अजित पवार गट युती करतील. काही भागांमध्ये भाजप बाजूलाही राहू शकतो. स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहूनच युतीचे निर्णय घेतले जातील, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. मंत्री भुजबळ पुढे म्हणाले, “आम्ही मराठा आरक्षण विरोधी नाही. उलट मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, हीच आमची भूमिका आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. मात्र स्टेजवर कोण जाईल हे कोण ठरवणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
एक 'कावळा पार्क' सुरू करा
जैन मुनींच्या कबुतर प्रकरणावर विनोदी शैलीत बोलताना ‘सगळीकडे हत्ती, कुत्रे, कबूतर अशाच चर्चा आहेत. मला वाटते सरकारने आता 'चिमणी पार्क' आणि 'पोपट पार्क' सुरू करावेत. एक 'कावळा पार्क' आहे, तो दहाव्याच्या दिवशी लागतो, त्याचेही पार्क करावे असे सांगत टिप्पणी केली. ठाकरे कुटुंब एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे. माझ्या पत्नी या उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मैत्रिणी आहेत. ठाकरे घराण्यात ज्येष्ठ म्हणून कुंदा वहिनींचा आदर आहे असेही भुजबळ यांनी सांगितले.