

नाशिक : राज्यासह नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीने पीकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात त्या-त्या जिल्ह्यातील मंत्री पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत. मात्र, नाशिक जिल्ह्यात पालकंमत्र्यांअभावी शेतकरी वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. मंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ यांच्या व्यातिरिक्त इतर मंत्र्यांने नुकसानग्रस्त भागांची पाहणीला बगल दिल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह सर्व मंत्रीमंडळ मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्र्यांना जिल्ह्यात जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले आहे. परंतू, नाशिकला पालकमंत्रीच नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जिल्हयाला चार मंत्री आहेत. मात्र, मंत्री भुजबळ वगळता एकाही मंत्र्यांना पाहणीसाठी शेतकपर्यंत पोहचलेले नाही. मंत्री भुजबळ यांनी गुरूवारी (दि. 25) येवला व निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. मंत्री झिरवाळ यांनी पेठ तालुक्यातील तोंडवळ, आडगाव, अध्रृटे, खोकरतळे, बिलकस, केळविहीर, रानविहीर, आडगाव भूवन आदी गावात शेतकऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, मंत्री भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यात नुकसानाची पाहणी केली. तर शुक्रवारी (दि. 26) ते नाशिक जिल्ह्यात मालेगाव, निफाड, येवला भागात पाहणी करणार आहेत.
मंत्री कोकाटे मुंबईत
कृषीमंत्रीपदाची धुरा सांभाळणारे मंत्री माणिकराव कोकाटे मे महिन्यात अवकाळी झाल्यानंतर थेट बांधावर पोहचले होते. परंतू, आता ते पाहणीसाठी जिल्ह्यात नाहीत. ते गुरूवारी मुंबईत असल्याचे सांगण्यात आले.
दोन दिवसात जो काही पाऊस पडला त्यात १३ हजार ८०१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल शासनाला दिला आहे. पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिलेले आहेत. लवकरच पंचनाम्याला सुरूवात होईल.
रविंद्र माने, जिल्हा अधिक्षक कृषी विभाग
जिल्ह्यात १३ हजार ८०१ हेक्टरला फटका
दोन दिवसात मालेगाव आणि नांदगाव या दोन तालुक्यांत ६५ गावांमधील २० हजार २२२ शेतक-यांचे १३ हजार ८०१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. यात मालेगावला येथील ३४ गावांमधील १९,३९५ शेतक-यांच्या एकूण १३ हजार २९१ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. त्यात ४ हजार ३१६ हेक्टरवरील मका तर २ हजार १४५ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले आहे. कापूसही पावसाच्या तडाख्यात सापडला आहे. तब्बल ५ हजार ०१४ हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाले आहे. तसेच १ हजार ७१३ हेक्टरवरील बाजरी, भुईमूग, भात या पिकांचे नुकसान झाले आहे. ९८ हेक्टरवरील डाळिंब बागेलाही फटका बसला आहे. नांदगावला २८ गावांमधील ८१८ शेतकऱ्यांच्या ५१० हेक्टरवरील पिकांना हानी पोहचली आहे. ३१५ हेक्टरवरील मका तर १०५ हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाले. ५० हेक्टरवरील कांदा, ४० हेक्टरवरील बाजरी, भुईमूग, भात या पिकांना फटका बसला. मालेगाव व नांदगाव या दोन्ही तालुक्यांमधील एकूण ४ हजार ६३१ हेक्टरवरील मका, ५ हजार ११९ हेक्टरवरील कापूस ,२ हजार १९५ हेक्टरवरील कांदा आणि १ हजार ७५३ हेक्टरवरील बाजरी, भुईमूग, भाताचे नुकसान झाले आहे.