

नाशिक : प्रजासत्ताकदिनी जलसपंदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले असले तरी, पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसल्याने प्रशासकीय पातळीवर अनेक कार्यक्रमांबाबत पेच निर्माण होत आहे. दरवर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा यामुळे लांबणीवर पडत आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे या स्पर्धा 4 व 5 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नेमके कोणी करायचे हा तिढा मात्र सुटलेला नाही. त्यासाठी प्रोटोकाॅलप्रमाणे आमंत्रण पत्रिका बनविली जात असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषदेकडून दरवर्षी अध्यक्ष चषक स्पर्धा आयोजित केल्या जातात. यंदाही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तालुकास्तरावर चषक स्पर्धा सुरू झाल्या असून अंतिम जिल्हास्तरीय स्पर्धा शहरात होते. त्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाकडून होते. या स्पर्धेचे उद्घाटन प्रोटोकाॅलप्रमाणे पालकमंत्री करतात. मात्र, पालकमंत्री निश्चित झाले नसल्याने या स्पर्धेचे उद्घाटन लांबणीवर पडले. पालकमंत्री महाजन यांची घोषणा झाल्यावर, प्राथमिक शिक्षण विभागाने उद्घाटनाची तयारी सुरू केली. मात्र, मंत्री महाजन यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती आली. हा तिढा आठवडा उलटूनही सुटू शकलेला नाही. त्यामुळे जि.प. प्रशासनाने या रखडलेल्या स्पर्धा येत्या 4 व 5 फेब्रुवारी रोजी हिरावाडीतील विभागीय क्रीडा संकुल येथे घेण्याचे निश्चित केले. तत्पूर्वी 31 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय स्पेलिंग बी व मॅथ बी स्पर्धा कालिदास कलामंदिर येथे होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजना संदर्भात सोमवारी (दि.27) शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी बैठक घेतली. यात या स्पर्धेचे उद्घाटनासह सर्व तयारीचा आढावा घेत सर्व अधिकाऱ्यांवर जबाबजारी सोपविली.