

येवला : पुढारी वृत्तसेवा
शहरात एका प्रेमविवाहावरून वादाची घटना घडली. नोंदणी विवाहानंतर पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या लग्नसोहळ्यात मुलीच्या नातेवाइकांनी मनात राग धरून नवरदेवाच्या कुटुंबीयांवर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारानंतर दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये ८ ते ९ जण जखमी झाले आहेत.
तालुक्यातील ऋषभ भगुंडे याचे निफाड तालुक्यातील रामपूर नैताळे येथील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनी सप्टेंबर महिन्यात पळून जाऊन हिंदू विवाह कायद्यांतर्गत नोंदणी विवाह केला होता. रविवारी (दि. २५) येवला शहरातील आसरा लॉन्स येथे नातेवाइकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने त्यांनी लग्नसोहळा आयोजित केला होता.
सोहळा सुरू असतानाच मुलीच्या काही नातेवाइकांनी अचानक नवरदेवाच्या नातेवाइकांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करून मारहाण केली. या हल्ल्यामुळे लग्नसोहळ्यात एकच खळबळ उडाली होती. नवरदेवाच्या नातेवाइकांनीही प्रतिकार केल्यामुळे दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी दिली.