नाशिक : नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा हा हरित कुंभमेळा म्हणून नियोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत नाशिकमध्ये वृक्ष लागवड व संवर्धनाचा विक्रम होणारा असून देशात व राज्यात नावलौकिक झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
नाशिक शहरात 15 हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत हरित कुंभ मोहिमेचा शुभारंभ मखमलाबाद येथील भोईर मळ्यात मंत्री महाजन यांच्या हस्ते व साधू, संत, महंत यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. त्याप्रसंगी मंत्री महाजन बोलत होते. नाशिकचा कुंभमेळा होत असताना गोदावरी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भात नियोजन केले आहे.
विकास कामे होताना अतिक्रमित बाधित लोकांना, विस्थापितांची जबाबदारी शासनाने घेतली आहे सर्वांना आधार दिला जाईल सरकार यासाठी सकारात्मक असल्याचे महाजन यांनी सांगितले. याबरोबरच ज्या ज्या ठिकाणी वृक्षारोपण केले जाईल त्यांचे संवर्धन करण्यात येईल. त्यासाठी नाशिककरांनी आपले योगदान देणे गरजेचे आहे व सर्वांचे येथे जबाबदारी आहे. कुंभमेळा ही आपली, संस्कृती, अस्मिता आहे. नाशिक शहराला आगळे वेगळे महात्म्य लाभले आहे. आध्यात्मिक वारसा लाभलेल्या या धार्मिक नगरीत तपोवनात साधू, महंतांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक तेवढेच वृक्ष काढण्यात येणार आहेत. या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येईल. तसेच आई वडिलांच्या नावाने एका रोपाची लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. त्यासाठी नाशिककरांनी पुढे आले पाहिजे. एवढेच नव्हे तर ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल. त्यासाठी सामाजिक दायित्व निधीची मदत घेण्यात येईल, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.
यावेळी आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांच्यासह महंत हरिगिरीजी महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, शंकरानंद महाराज, जनार्दन हरी महाराज, स्वामी भागवतानंद यांच्यासह प्रमुख आखाड्यांचे साधु,संत, महंत आदी उपस्थित होते.