

महत्त्वाचे मुद्दे
दीड लाख वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प
झाडे लावण्यासोबत संगोपनावर अधिक भर
रोपांना जिओ टॅगिंग करणार
नाशिक : यंदा शहरात दीड लाख वृक्षांची लागवड करून ‘हरितकुंभ’ साजरा करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणार्या या उपक्रमात सर्व शासकीय कार्यालये सहभागी होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने येत्या 16 जुलै रोजी भारतीय प्रजातींच्या दीड लाख वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला असून, लागवडीनंतर त्यांच्या संगोपन व संवर्धनावर विशेष भर देण्यात येणार आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जिल्हास्तरावर होणार्या वृक्षलागवडीसंदर्भात मंगळवारी (दि.8) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषद, महापालिका, धान्यपुरवठा विभाग, सामाजिक वनीकरण, जलसंपदा विभाग, वनविकास महामंडळ, कृषी विभाग, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दरवर्षी पावसाळ्यात शासनातर्फे वृक्षलागवडीची मोहीम राबविली जाते. मात्र, वृक्षलागवडीनंतर संगोपन आणि संवर्धनाअभावी झाडांची वाढ खुंटते, काही झाडे देखभालीअभावी मरतात. यामुळे वृक्षलागवडीच्या मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. यंदा शासनाने यावर उपाय म्हणून केवळ दीड लाख झाडे लावण्यावर भर दिला असून, त्यांच्या संगोपनावर अधिक भर देण्यात येणार आहे.
अभियानात विविध खेडोपाड्यांमध्ये हरित टेकडी, ग्रामपंचायत परिसर, शाळा, रस्त्यांच्या कडेला, धार्मिक व सार्वजनिक स्थळे, उद्याने, मोकळी मैदाने आदी ठिकाणी देशी प्रजातींची वड, पिंपळ, मोह, बेल आदी झाडे लावण्यात येणार आहेत.
वृक्षलागवडीच्या मोहिमेसाठी सामाजिक वनीकरण विभागाची मदत घेण्यात येणार आहे. सध्या विभागाकडे भारतीय प्रजातींची एक लाख 64 हजार झाडे उपलब्ध आहेत. याशिवाय, विविध नर्सरींकडूनही झाडांची खरेदी करण्यात येणार आहे. मोहिमेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
झाडांच्या देखभालीसाठी रोपांना जिओ-टॅगिंग करण्यात येणार आहे. झाडे लावताना, संगोपन व संवर्धनाच्या काळात, तसेच झाडे पूर्ण वाढ झाल्यानंतर अशा तीन टप्प्यांत जिओ-टॅगिंगसह फोटोशूट करण्यात येईल. याशिवाय, झाडांची नियमित तिमाही समीक्षा व्हिडीओ क्लिपद्वारे केली जाणार आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे 16 जुलै रोजी भारतीय प्रजातीच्या 16 लाख वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. मोहिमेत सर्व शासकीय विभाग सहभागी होतील. नागरिकांनीही आपल्या परिसरात वृक्षलागवड करावी.
जलज शर्मा, जिल्हाधिकारी