

नामपूर (नाशिक): सोन्याच्या दराला झळाळी प्राप्त होताच सोने चोरीसाठी चोरटे वेगवेगळी शक्कल लढवित आहेत. यातूनच महिला व वृद्धांना एकांत गाठून चेन स्नॅचिंग व सोने चोरीचे प्रकार वाढले आहेत. अशातच चोरट्यांनी आता सोने मिळविण्यासाठी स्मशानभूमीतील राखेकडे मोर्चा वळविला आहे.
नामपूर येथे स्मशानभूमीतील राख गायब झाल्याच्या प्रकाराने या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. येथील इंदिरानगरमधील सुरेखा खैरनार (40) यांचे निधन झाले. हिंदू रीतीरिवाजानुसार अंत्यविधी झाला. दुसर्या दिवशी अस्थिविसर्जन करण्यासाठी नातेवाईक व आप्तेष्ट गेले असता मृतदेहाला अग्निडाग दिला त्या ठिकाणची राखच गायब झालेली आढळली. सुरेखा यांचे अल्प आजाराने शनिवारी (दि.17) निधन झाले. महिलेचा मृत्यू झाल्याने राखेत सोने असावे या हेतूने चोरट्यांनी सोने मिळविण्यासाठी राख पोत्यात भरून चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अंत्ययात्रेप्रसंगी महिलेच्या अंगावर थोडे दागिने असतात. यामुळे चोरटे पाळत ठेवून असावेत. त्याचवेळी हा जादूटोण्याचा प्रकार आहे की, काय असाही संशय आहे. मात्र, यात फारसे तथ्य नसल्याचा अंदाज आहे. स्मशानभूमीत काही टवाळखोर व दारुड्यांचा वापर असतो. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे