

नाशिक : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. मात्र, यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील पावणेदोन लाख एकर द्राक्षशेतीपैकी सुमारे ३५ हजार एकरवर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालवली आहे. यात सर्वात जास्त नाशिक तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांत शेतकरी सध्या फक्त द्राक्षझाडांची तोड करत आहेत. त्याचा परिणाम द्राक्ष एक्सपोर्ट, मजूर, औषध विक्रेते, औषध कंपन्या, पॅकिंगसाठी लागणारे बॉक्स व्यवसायावर होणार आहे.
जिल्ह्यात सुमारे १ लाख ७५ लाख एकरवर द्राक्ष पीक होते. अवकाळी पावसामुळे अनेक द्राक्षबागात फळधारणा न झाल्याने सुमारे ३० टक्के द्राक्षबाग शेतकऱ्यांनी तोडली आहे. अजूनही काही ठिकाणी द्राक्षझाडांची तोड चालू आहे. ज्या शेतकऱ्यांनी द्राक्षबागेची तोड केली नाही, त्या द्राक्षबागेतही फक्त ५० टक्केच उत्पन्न येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात द्राक्ष एक्स्पोर्ट करणारे ५० व्यावसायिक आहेत. त्यांच्या व्यवसायावरही माेठा फरक जाणवणार आहे. यासह जिल्ह्यात ६०० प्री कुलींग युनिट आहेत. त्यातील अनेक युनिट बंद करण्याच्या मनस्थितीत शेतकरी आले आहे. फक्त नाशिक तालुक्याचा विचार केला या परिस्थितीमुळे एक्स्पोर्ट होणाऱ्या द्राक्षावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.
अनेक एक्स्पोर्टचे व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. याचा सर्वात जास्त तोटा औषध विक्रेत्यांना सहन करावा लागणार होणार आहे. अनेक औषध विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना उधारीवर औषधे दिल्याने त्यांची उधारी वसूल होण्याची शक्यता कमी आहे. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याच्या पाच ते सहा घटना समोर आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आता पावसाची परिस्थिती बघून योग्य हवामानानुसार इतर पिके घेण्याकडे वळावे, असा सल्ला अनेक शेतीतज्ञांनी दिला आहे. द्राक्षाबरोबरच टोमॅटो, कारले, सिमला मिरची, कांदा, डाळिंब, कापूस, सोयाबिन या पिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. जे उत्पन्न निघाले त्याला योग्य भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात गेला आहे.
सध्या संपूर्ण जगामध्ये हवामान बदलाचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांनी दोन- तीन वर्ष तरी इतर पिकांकडे वळावे. तरच शेतकरी आर्थिक प्रगती करू शकेल. शेतकऱ्यांनी आत्महत्येचा पर्याय कधीही स्विकारू नये.
बाळासाहेब म्हैसधुने, मुंगसरा (ता. नाशिक)
या गावांत मोठ्या प्रमाणात तोड
मुंगसरा, गिरणारे, दुगाव, आभाळेवाडी, मनोली, वाडगाव, साडगाव, धोंडेगाव, नागलवाडी, पिंपळगाव गरुडेश्वर, शिवणगाव, गणेशगाव, महिरावणी, मातोरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांची तोड चालू आहे. काही गावांत नावालाही द्राक्षपीक राहणार नाही अशी परिस्थिती आहे.