

नाशिक : राज्यात 2025 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची नव्याने प्रभागरचना तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. त्यात जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
लोकसभा- विधानसभा निवडणुका निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपुष्टात येणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये नव्याने प्रभागांची पुनर्रचना केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात गावनिहाय प्रारूप प्रभागरचना तयार करण्यात आल्या आहेत. येत्या 27 तारखेपर्यंत तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रारूप प्रभागरचनांना मान्यता देतील. त्यावर 30 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीत सर्वसामान्यांना हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. दाखल हरकती व सूचनांबाबत उपविभागीय अधिकारी 14 जानेवारीला सुनावणी घेऊन 20 तारखेपर्यंत त्यावर अभिप्राय नोंदवून त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील. जिल्हाधिकारी हे 22 जानेवारीपर्यंत प्रस्ताव तपासून अंतिम प्रभागरचनेला मान्यता देतानाच त्याचे सादरीकरण आयोगाकडे करतील. तसेच 24 जानेवारीला अंतिम प्रभागरचनेला जिल्हाधिकारी व्यापक प्रसिद्धी देतील.
जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 196 ग्रामपंचायतींची प्रभागरचना यापूर्वीच अंतिम झाली असून, यासर्व ठिकाणी जानेवारीत निवडणुकांचा बार उडणार आहे. तसेच पाच तालुक्यांतील नऊ ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेला प्रारंभ झाल्याने इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
मालेगाव : काष्टी, सावतावाडी, वडनेर.
दिंडोरी : रवळगाव, ननाशी, सावरपाडा / रडतोंडी
बागलाण : अलियाबाद
त्र्यंबकेश्वर : खरशेत
देवळा : वरवंडी