

नाशिक : सरकारने देशातील पेट्रोल आणि डिझेलवर एक्साइज ड्यूटीत प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वाढलेल्या एक्साइज ड्यूटीचा बोजा तेलकंपन्या सहन करणार असल्याने या दरवाढीचा ग्राहकांना कुठलाही फटका बसणार नसल्याचा दावा नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनतर्फे करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी आहेत. त्याचा फायदा केंद्र सरकारने ग्राहकांना करून देणे अपेक्षित असताना सरकारने एक्साइज ड्यूटीत वाढ करत नफा खिशात घातला आहे. त्यासाठी एक्साइज ड्यूटीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर आकारला जाणारे उत्पादन शुल्क (एक्साइज डयूटी) हा केंद्र सरकारकडून आकारला जाणारा कर आहे. या करामुळे इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असतात. सध्या पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर १९.९० रुपये आहे. डिझेलवरील उत्पादन शुल्क सुमारे १५.८० रुपये प्रतिलिटर आहे. सन २०१४ मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क ९.४८ रुपये प्रतिलिटर होते. डिझेलवर ते ३.५६ रुपये प्रतिलिटर होते. नंतर त्यात अनेक वेळा वाढ करण्यात आली. सोमवारी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली. पेट्रोल व डिझेलवरील एक्साइज ड्यूटी वाढविली असली तरी हा बोजा इंधन कंपन्या सहन करणार असल्याने ग्राहकांना दरवाढीची झळ पोहोचणार नाही, असा दावा नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनने केला आहे.
पेट्रोल व डिझेलवरील वाढलेल्या करांच्या दराचा बोजा आॉइल कंपन्या सहन करणार असल्याने ग्राहकांना त्रास होणार नाही. कुठलेही दर वाढणार नाहीत. मात्र शासनाने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करून ग्राहकांनाही दिलासा द्यायला हवा.
विजय ठाकरे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशन