नाशिक : डॉक्टर्स मानवतेचे अनमोल कार्य करत असतात. राज्यातील शासकीय रुग्णालयांचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण केले जाणार असून, भावी डॉक्टरांंनी ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालये, आरोग्य केंद्रांत महिन्यातून एक दिवस तरी रुग्णसेवा द्यावी. व्यवसायाला मानवतेचा स्पर्श देऊन सेवा करावी, असे आवाहन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन् यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २४ वा दीक्षान्त समारंभ सोमवारी (दि. २४) उत्साहात पार पडला. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. आरोग्य विज्ञान क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानामुळे सातत्याने बदल होत आहेत. हे तंत्रज्ञान आत्मसात करावे. आरोग्य विज्ञान क्षेत्रासह जीवनात नावीन्याची ओढ आणि कठोर परिश्रम गरजेचे असतात. रुग्णांप्रती नेहमीच सौजन्यपूर्ण वर्तणूक ठेवावी. गरीब आणि दुर्लक्षित घटकांना वैद्यकीय सेवेचा उपयोग व्हावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. बी. एन. गंगाधर, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, प्रति कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद निकुंभ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, कुलसचिव राजेंद्र बंगाळ यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते.
गंगाधर म्हणाले की, एकात्मिक आरोग्य, संयुक्त उपचार पद्धतींना, शिक्षणाला महत्त्व येत आहे. पारंपरिक पद्धतीबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, डिजिटल हेल्थ सिस्टीम असे उपक्रम विद्यापीठ राबवत आहे. विद्यार्थ्यांनी पदवी मिळवली म्हणजे शिक्षण संपत नसून, ती निरंतर प्रक्रिया आहे. कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी प्रास्ताविक केले.
रुग्णसेवा ही ईश्वरसेवाच असते. विद्यार्थ्यांनी व्यवसायाला नैतिकतेचे अधिष्ठान देत सेवाभाव जपावा. विद्यापीठाचा, गुणवत्तेचा दर्जा याहीपेक्षा अधिक सुधारण्याच्या विद्यापीठातील नवनवीन उपक्रमांना राज्य शासनाचे पाठबळ मिळेल, अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
राज्यपालांच्या हस्ते १५ विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवी देऊन गौरविण्यात आले. विविध विद्या शाखांतील १११ विद्यार्थांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विविध विद्या शाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या आणि आंतरवासीयता पूर्ण केलेल्या ८ हजार ५४७ विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ७५ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला. तेथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी 'फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया'चे मेजर जनरल असिम कोहली उपस्थित होते.
संवाद क्रांतीने अवघे जग 'विश्वग्राम' झाले आहे. वैद्यक विज्ञानात रोज होणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनाने जागतिक स्तरावर आरोग्यसेवा क्षेत्रात संधी वाढत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी किमान एक विदेशी भाषा शिकून सेवेला जागतिक स्तरावर नेण्याचे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.