

Nashik Police Commissioner Sandeep Karnik Honored For Anti-Drug Campaign
नाशिक : नशेच्या काळ्या बाजारपेठेवर कठोर प्रहार करत नाशिक शहर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीत पोलिसांनी ७९ गुन्हे दाखल करून १७४ तस्करांना अटक केली. तब्बल दोन कोटी १५ लाख ८७ हजार ५६६ रुपयांचा अमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेषतः तरुणाईला विळख्यात ओढणाऱ्या एमडी या घातक अमली पदार्थाच्या तस्करीविरोधात पोलिसांनी निर्णायक कारवाया केल्या आहेत. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा विशेष गौरव करण्यात आला.
मराठा विद्या प्रसारक समाज आणि एसजेए अॅनालिटिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. २८) आयोजित 'से नो टू ड्रग्ज' शपथविधी सोहळ्यात हा सन्मान सोहळा पार पडला. अमली पदार्थाविरोधातील पोलिसांच्या मोहिमेला मिळालेल्या या गौरवामुळे शहरातील नशाविरोधी लढ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कारवाईसोबत जनजागृतीही
अमली पदार्थांचा प्रश्न केवळ गुन्हेगारीपुरता मर्यादित नसून तो तरुणाईच्या भविष्याशी निगडित आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाईसोबत जनजागृती आणि समुपदेशनाच्या उपक्रमांनाही महत्त्व दिले आहे. व्यसनाचे दुष्परिणाम, तस्करीचे धोके आणि नशेपासून दूर राहण्याबाबत युवकांत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
'अमली पदार्थमुक्त नाशिक'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तस्करीच्या साखळीवर कठोर कारवाई आणि समाजाचा सक्रिय सहभाग या दोन्ही बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे नशेच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या लढ्याला बळ मिळाले असून, राज्यपालांकडून झालेला गौरव हा या प्रयत्नांची दखल घेणारा ठरला आहे.
इतर पदार्थांवरही कारवाई
पोलिसांची मोहीम केवळ एमडीपुरती मर्यादित राहिलेली नाही. गांजा, चरस, भांग, अॅफेटामाइन आणि डोडा यांसारख्या अमली पदार्थांविरोधातही कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेत ३३२ किलोहून अधिक गांजा आणि २८० किलो भांग जप्त करण्यात आले आहे. तस्करीचे धागेदोरे शोधण्यासाठी इतर जिल्ह्यांपर्यंतही कारवाईचे सत्र सुरू ठेवण्यात आले.
एमडी तस्करीवर प्रहार
नोव्हेंबर २०२३ मध्ये पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संदीप कर्णिक यांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर भूमिका घेतली. एमडीसारख्या घातक पदार्थांच्या विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी तपास, छापे आणि संशयितांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले. उपलब्ध आकडेवारीनुसार, एमडीसंदर्भात ४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १११ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या कारवायांत १ किलो ९५२ ग्रॅम ७२ मिलिग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. त्याची किंमत एक कोटी ३१ हजार २९५ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.