'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असे म्हटले जाते. पोटच्या मुलाला नऊ महिने वाढविण्यापासून ते त्याच्यावर सोळा संस्कार करेपर्यंत आईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र, याच आईला मुलाच्या नावात वडिलांसोबत स्थान दिले जात नव्हते. मात्र, आता वडिलांच्या नावाअगोदर नाव लावण्याचा अधिकार 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयाने आईला प्राप्त करून दिला आहे.
1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाच्या नावात वडिलांच्या नावाअगोदर आईचे नाव लावण्याचा निर्णय घेऊन शासनाने आईला सन्मान प्राप्त करून दिला आहे. त्यामुळे आता शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे.
आतापर्यंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, जन्म व मृत्यू नोंदी दाखला, सेवापुस्तक, विविध परीक्षांची आवेदन पत्रे इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये आइचे नाव वेगळ्या स्तंभामध्ये दर्शविण्यात येत होते. स्त्री समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी जोपर्यंत आईला वडिलांसोबत नावात सन्मान मिळत नाही तोपर्यंत स्त्री-पुरुष समानता येणार नाही हे निश्चित होते. याचाच विचार करून शासनाने महिला-पुरुष समानता, महिलांप्रती सन्मानाची भावना तसेच एकल पालक महिला यांची संतती (अनौरस संतती) यांना समाजात ताठ मानाने जगता यावे यासाठी शासकीय दस्तवेजांमध्ये अगोदर मुलाचे नाव,आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव, सर्वात शेवटी आडनाव अशा स्वरूपात नोंदी करण्याचा धोरणात्मक निर्णय बंधनकारक केला.
1999 मध्ये शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, जन्म-मृत्यू नेांदणी, शिधावाटप पत्रिका, रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी, लोकसेवा आयोगाच्या परीक्षा इत्यादींच्या आवेदनपत्रावर तसेच अन्य शासकीय /निमशासकीय कागदपत्रांवर /अभिलेखांवर वडिलांच्याच नावाचा उल्लेख करण्यात येत होता. आईचे नाव स्वतंत्र लिहिले जात होते. सन 2000 च्या नियमानुसार विद्यार्थ्याने पूर्ण नाव लिहिल्यानंतर आईचे नाव लिहिण्याची पद्धत होती. 2010 च्या निर्णयानुसार घटस्फोटित महिला असल्यास वडिलांच्या नावाऐवजी आईचे नाव लिहिण्यास परवानगी होती. मात्र, आता हे तीनही निर्णय रद्द करून अगोदर मुलाचे नाव, नंतर आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशा स्वरूपात नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजित आशाताई अनंतराव पवार, देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस या नावांच्या पाट्या आपल्या दालनात लावल्या आहेत.
निर्णय आल्यानंतर नागरिकांच्या मनात सर्व कागदपत्रे बदलावी लागतील का, मुलीचे लग्न झाल्यानंतर पतीच्या नावाच्या आधी आईचे नाव लावायचे का, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, याचे उत्तरही शासनाने दिले आहे. 1 मे 2024 पासून पुढे जे काही जन्मदाखले, शाळा सोडल्याचे दाखले, शासकीय दस्तऐवज तयार होतील. त्यातच आईचे नाव लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विवाहित स्त्रीच्या बाबतीत आईचे नाव लावायचे की नाही, पतीचे नाव लावायचे की लग्नाआधीचे नाव कायम ठेवायचे की नाही याचा निर्णय त्या स्त्रीने घ्यायचा आहे, असे शासनाने सांगितले.
सर्व 1 मे 2024 नंतर नागरिकांनी आपल्या घराच्या पाट्या, शासकीय दस्तऐवज, कागदोपत्री केले जाणारे व्यवहार, शासकीय फॉर्म यावर वडिलांच्या नावाअगोदर आईचे नाव लिहावे. जेणेकरून आईला सन्मान प्राप्त करून देता येईल.
सुनील शोभा लक्ष्मण दुसाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नाशिक.
जन्मदाखला
शाळा प्रवेश आवेदनपत्र
सर्व शैक्षणिक कागदपत्रे
जमिनीचा सातबारा, प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे
शासकीय/निमशासकीय कर्मचार्यांचे सेवापुस्तक
शासकीय/निमशासकीय कर्मचार्यांच्या सॅलरी स्लीप
शिधावाटप पत्रिका (रेशनकार्ड)
मृत्यू दाखला