दिलासादायक बातमी! प्रेसमध्ये आता दरवर्षी पाच टक्के वारसांना सेवेत घेणार

प्रेसचे व्यवस्थापकीय संचालक विजय रंजन सिंघ यांची माहिती
सिक्युरीटी प्रिंटींग ॲण्ड  
प्रिटींग कॅार्पोरेशन
देवळाली कॅम्प: सिक्युरीटी प्रिंटींग ॲण्ड प्रिटींग कॅार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक विजय रंजन सिंघ यांचा सत्कार करताना महाव्यवस्थापक राजेश बन्सल, डॉ. डी. के. रथ. प्रेस मजदुर संघाचे सरचिटणीस जगदिश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, रामभाऊ जगताप, रवी गोजरे आदी.(छाया : सुधाकर गोडसे)
Published on
Updated on

देवळाली कॅम्प: देशातील प्रेस महामंडळातील नऊ युनिटपैकी दोनच युनिटमधून पन्नास टक्के नफ्याचे योगदान मिळत आहे. त्यात नाशिक रोडचा समावेश आहे. या कामगिरीमुळे कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये वाढ होणार आहे. आत्तापर्यंत 135 मयत कामगारांच्या वारसांना सेवेत घेतले असून यापुढेही दरवर्षी पाच टक्के वारसांना सेवेत सामावून घेतले जाणार असल्याची महत्वपुर्ण घोषणा सिक्युरीटी प्रिंटींग ॲण्ड मिटींग कॅार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक विजय रंजन सिंघ यांनी केली. (Due to the performance of Nashik Road, the provident fund of the workers will increase)

व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विजय रंजन सिंघ यांनी प्रथमच नाशिकरोड येथील भारत प्रतिभुति व चलार्थपत्र मुद्रणालय यांना भेट दिली. प्रेस मजदुर संघ व स्टाफ युनियनच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रेसचे महाव्यवस्थापक राजेश बन्सल, डॉ. डी. के. रथ. प्रेस मजदुर संघाचे सरचिटणीस जगदिश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, रामभाऊ जगताप, कार्याध्यक्ष रवी गोजरे, मागासवर्गीय संस्थेचे सरचिटणीस विकास बर्वे, वर्क्स कमिटीचे उपाध्यक्ष मनोज सोनवणे आदी उपस्थित होते.

यावेळी सिंघ यांनी मयत कामगारांच्या वारसांना सेवेत घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ व वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेण्याकरिता अनेकांनी मोठी मदत केल्याचे स्पष्ट केले. कामावर घ्यावयाच्या कामगारांची सेवा ज्येष्ठता यादीही तयार करून ठेवल्याचे स्पष्ट करताना त्यात कोणीही बदल करू शकत नाही. कामावर घेतलेल्या पाल्यांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे लिहून दिले असले तरी मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपला व्यवहार ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.

लक्ष्मीपूजनावेळी काम

राजेश बन्सल म्हणाले की, दीपावलीदरम्यान चाळीस हजार जंबो पासपोर्टची मागणी आली होती. आमच्याकडे फक्त चारशे पासपोर्ट शिल्लक होते. नाशिकच्या कामगारांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशीसुद्धा कामावर हजर राहुन अवघ्या तीन दिवसांत ही मागणी पूर्ण केली. त्यामुळे कामगार व व्यवस्थापन यांचे संबंध किती दृढ आहे, हे सांगताच विजयरंजन सिंग भारावून गेले. मयत कामगारांच्या वारसांचे कुटुंबीयांचे प्रपंच उभे राहण्यास सिंघ यांचा मोठा वाटा असल्याचे गोडसे यांनी सांगितले.

सिंग यांनी जिंकली मने

विजय रंजन सिंघ यांनी मयत कामगारांच्या परिवारांसमवेत बसुन हितगुज साधले. प्रत्येक कामगाराच्या जागेवर जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांच्या पाठीवर प्रेमाची थाप दिली. त्यामुळे कामगारांचे नातेवाईक गहिवरून गेले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news