नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून सिटीलिंकच्या चालकांनी पुकारलेल्या संपाला अखेर यश आले असून, ऑपरेटर्स कंपन्यांकडून चालकांच्या वेतनात पाच हजार रुपयांची त्रैवार्षिक वाढ करण्यात आली आहे. तसेच प्रति किलोमीटर इन्सेटिव्ह आणि ओव्हरटाइमचा मेहनतानाही वाढविण्यात आला असून, सलग दोन ड्यूटी केल्यास चालकांना एक दिवसाचे अतिरिक्त वेतन मिळणार आहे. मागण्या मान्य झाल्यामुळे संप मागे घेण्यात आला असून, सोमवारी (दि.२९) दुपारी साडेचारच्या सुमारास तपोवन डेपोतून ६०, तर नाशिकरोड डेपोतून ४५ बसेस सोडण्यात आल्या. मंगळवारपासून बससेवा सुरळीत होणार असल्याचे सिटीलिंक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
वेतनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सिटीलिंक बसचालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली शनिवार (दि.२७)पासून संप पुकारला होता. मूळ वेतनात १२ हजारांची वाढ करण्यासह प्रोत्साहन भत्ता वाढवून मिळावा, प्रतिकिलोमीटर दोन रुपये प्रोत्साहन भत्ता मिळावा. तसेच तपोवन डेपो व नाशिक रोड बसचालकांचे मूळ वेतन समान करावे आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. अचानक सुरू झालेल्या या संपामुळे प्रवाशांचे विशेषत: विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे हाल झाले. संपावर तोडगा काढण्यासाठी सिटीलिंक प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे नेते अंकुश पवार तसेच ऑपरेटर्स कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत सिटीलिंक प्रशासनाने चर्चा घडवून आणली.
रविवारी (दि.२८) रोजी रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात बैठक सुरू होती. अखेर या संपावर तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. बसचालकांना पाच हजार रुपयांची त्रैवार्षिक वाढ करण्यात आली आहे. यात यावर्षी दीड हजार, पुढील वर्षी दीड हजार आणि तिसऱ्या वर्षी दोन हजार रुपयांची वेतनवाढ दिली जाणार आहे. त्याचबरोबर चालकांना दिला जाणारा ६८ पैसे प्रति किलोमीटर इन्सेन्टिव्ह ९० पैसे प्रति किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आला आहे. चालकांना नियमानुसार रजा दिल्या जाणार असून, सलग दोन ड्यूटी केल्यास एका ड्यूटीचा अतिरिक्त पगार दिला जाणार आहे. मागण्या मान्य झाल्यामुळे संघटनेने संप मागे घेतला. त्यामुळे सोमवारी दुपारी साडेचारनंतर तपोवन डेपोतून ६०, तर नाशिक रोड डेपोतून ४५ बसेस सोडण्यात आल्या. मंगळवारी सकाळपासून पूर्ण क्षमतेने शहर बससेवा सुरू होईल, अशी माहिती सिटीलिंकचे महाव्यवस्थापक (संचलन) मिलिंद बंड यांनी दिली.
गेल्या तीन वर्षांतील हा अकरावा संप होता. या संपामुळे शनिवारी व रविवारी प्रत्येकी अडीच हजार तसेच सोमवारी दोन हजार बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे सिटीलिंकला तब्बल ७० लाखांचा तोटा झाला आहे. ऑपरेटर्स समवेत सिटीलिंकने केलेल्या करारानुसार सिटीलिंकला झालेला तोटा ऑपरेटर्सकडून वसूल केला जाणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक बंड यांनी दिली.
बसचालकांना न्याय मिळवून देण्यात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला यश आले आहे. बसचालकांवरील अन्याय दूर करण्यासाठीच हा संप पुकारला होता. या संपामुळे नाशिककरांना झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व. यापुढील काळात नाशिककरांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहू.
अंकुश पवार, नेते, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना, नाशिक.