

नाशिक : महापालिकेच्या दिवंगत, निवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त सफाई कामगारांच्या रिक्तपदी लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने 44 जणांची घनकचरा व्यवस्थापन विभागात सफाई कामगार या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
म्युन्सिपल कामगार कर्मचारी सेनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणीतील प्रारंभिक मूळ वेतन 15,000 रुपये दरमहा वेतनावर सुरुवातीची दोन वर्षे परिविक्षाधिन कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचे महापालिकेने जारी केलेल्या नियुक्तिपत्रात नमूद करण्यात आले आहे.
नाशिक, घनकचरा व्यवस्थापन विभागातील सेवानिवृत, दिवंगत आणि स्वेच्छानिवृती घेतलेल्या कर्मचार्यांच्या वारसांना तातडीने लाड व पागे कमिटीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नियुक्ती द्यावी, अशा आशयाचे निवेदन म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने महापालिका आयुक्तांना सादर करत या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता. गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी महापालिका प्रशासनाने वारसा हक्काने 44 सफाई कामगारांना नियुक्ती देण्याचा आदेश जारी केला. यामुळे वारसा हक्काने नियुक्ती मिळालेल्या सफाई कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.