नाशिक : गेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील करात कपात केल्याने, सोने-चांदीचे दर झपाट्याने खाली आले होते. मात्र मागील दोन महिन्यांपासून पुन्हा एकदा सोने-चांदीचे दर वाढत असून, सोन्याने ७३ हजार तर चांदीने ८८ हजारांचा आकडा पार केला आहे. जाणकारांच्या मते सणासुदीत दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने, गुंतवणूकीची हीच संधी असल्याचे आवाहन सराफ व्यावसायिकांकडून केले जाते.
पुढील महिन्यांपासून सणासुदीचे दिवस सुरू होत असून, या काळात बाजारात मोठी तेजी बघावयास मिळते. अर्थसंकल्पानंतर दर कमी झाल्याने, ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. मात्र, पुन्हा एकदा दर उच्चांकाकडे झेप घेवू लागल्याने, ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. व्यावसायिकांच्या मते, सणासुदीत विशेषत: दिवाळीमध्ये सोन्याबरोबरच चांदीचे दर देखील विक्रमी उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या १ जून रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ७२ हजार ७५० रुपये इतका होता. तर चांदी ९० हजारांपार होती. महिनाभरात म्हणजेच १ जुलै रोजी सोने दर ७२ हजार ५०० रुपयांवर आला. तर चांदी देखील ८७ हजार ८५० रुपयांनी खाली आली. आॅगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात आणखी घसरण झाली. १ आॅगस्ट रोजी सोन्याचा दर ७० हजार सातशे रुपये इतका कमी झाला. चांदी मात्र ८५ हजारांपार गेली. मात्र, गेल्या २३ दिवसात सोन्यात तब्बल साडेतीन हजारांची वाढ झाली असून, चांदी देखील ८७ हजारांवर पोहोचली आहे. सोन्या-चांदीच्या दरातील तेजी लक्षात घेता आगामी काळात सोने-चांदी दरात आणखी वाढ होण्याची शक्यता सराफांकडून वर्तविली जात आहे.
असे आहेत दर
२४ कॅरेट प्रति १० ग्रॅमसाठी सोने दर ७३ हजार ७० रुपयांवर नोंदविला आहे. तर २२ कॅरेट प्रति १० ग्रॅमसाठी ६६ हजार ९८० रुपये इतका नोंदविला आहे. तर चांदीचे दर एक किलोसाठी ८८ हजारांवर पोहोचले आहेत. गेल्यावेळी सोन्याच्या दराने ७५ हजार विक्रमी दर पार केला होता. आता ज्या तेजीने दर वाढत आहेत, त्यावरून पुन्हा एकदा सोने विक्रमी दर नोंदवू शकतात.