

नाशिक: गेल्या दीड महिन्यांपासून चांदी दररोज दराचे नवनवीन उच्चांक स्थापन करत चालली आहे. शनिवारी (दि. २७) चांदीच्या दराने एकाच दिवसात तब्बल पंधरा हजारांनी उसळी घेतली. त्यामुळे चांदीने अडीच लाखांचा टप्पा पार केला असून, ही घोडदौड अशीच सुरू राहण्याची चिन्हे आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेली मागणी, अमेरिकेकडून अर्थ व उद्योग क्षेत्रात उचलली जाणारी पावले, जगातील युद्धजन्य स्थिती यामुळे सोने, चांदीचे दर सतत वधारत आहेत. औद्योगिक प्रक्रियेत चांदीचा वाढलेला वापर व गुंतवणुकीसाठी उपलब्ध झालेला नवा पर्याय यामुळे चांदीच्या खरेदीला पसंती दिली जात आहे. त्यामुळे शुद्ध चांदी व सोन्याचीही खरेदी वाढली आहे.
११ डिसेंबरला २४ कॅरेट सोने १ लाख ३२ हजार ५६०, २२ कॅरेट सोने १ लाख २१ हजार ९६० रुपये प्रतितोळा, तर चांदी १ लाख ९४ हजार ६७० रुपये प्रतिकिलो असे दर होते. त्यानंतर पंधरवड्याने शुक्रवारी (दि. २६) २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६५० रुपये व २२ कॅरेट सोने १ लाख ३१ हजार २४० रुपये प्रतितोळा, तर चांदी २ लाख ३६ हजार ९०० रुपये प्रतिकिलो असे दर (जीएसटीसह) होते. एका दिवसातच मोठी वाढ होऊन चांदीने अडीच लाखांचा टप्पा ओलांडला, तर सोनेही सुमारे हजार रुपयांनी वधारले. शनिवारी (दि. २७) २४ कॅरेट सोने १ लाख ४३ हजार ४८० रुपये व २२ कॅरेट सोने १ लाख ३२ हजार रुपये प्रतितोळा, तर चांदी २ लाख ५३ हजार ९०० रुपये प्रतिकिलो असे दर नोंदवले.