

नाशिक: सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याचे आकर्षण सर्वानाच वाढले आहे. सोन्याच्या दरातील ही सलग तिसरी मासिक वाढ ठरली आहे. २०२४ मध्ये तब्बल २७.२४ टक्के वाढीनंतर या वर्षी सोन्याचे दर १६.३ टक्क्यांनी वाढले. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याने प्रति औंस ३,००० अमेरिकन डॉलर्सचा मोठा पल्ला पार केला आहे.
मॅक्वेरीसारख्या ब्रोकरेजने आगामी काळात सोनेदरात आणखी वाढीचा अंदाज वर्तवला आहे. गुंतवणूकदारांनी गोल्ड इटीएफ आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी का? किंवा ते फोमो (गुंतवणूक संधी गमावण्याची भीती) ठरणार का? आणि त्यामुळे ते घाईघाईने निर्णय घेण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी अतिशय सावधातेने निर्णय घेण्याचा सल्ला विविध फंडांच्या तज्ज्ञांनी दिला आहे.
सोन्याच्या १५ महिन्यांच्या तेजोमय रॅलीमागे अनेक कारणे आहे. जगभरातील भू-राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे सध्या सोने हा सर्वोत्तम कामगिरी करणारी मालमत्ता वर्ग ठरला आहे. अमेरिकेच्या धोरणांमध्ये जाणवणाऱ्या कमालीच्या अनिश्चिततेमुळे, विशेषतः व्यापार शुल्क धोरणांमुळे जागतिक अस्थिरतेत भर पडली आहे. त्यामुळे सोन्याला आधीच असलेला "सुरक्षित आश्रय" हा दर्जा आणखी दृढ झाला आहे. मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची विक्रमी खरेदी हाही एक प्रमुख घटक रॅलीला कारणीभूत ठरला आहे. मुळात या खरेदीमागे आपल्या मालमत्तेच्या साठ्यात विविधता आणणे तसेच अमेरिकी डॉलरसारख्या जगातील एकमेव प्रबळ चलन मालमत्तेवरील आपले अवलंबित्व कमी करणे, हा बँकांचा मुख्य उद्देश आहे.
दरवाढीचा हा प्रवाह कायम राहण्याची अपेक्षा आहे. भू-राजकीय तणावाची गुंतागूंत आणि मध्यवर्ती बँकांचे अमेरिकन ट्रेझरीजपासून दूर जाणे या प्रमुख घटकांचा एकत्रित परिणामसुध्दा सोन्यातील रॅलीला कारणीभूत आहे. भारतात, विवाह हंगामात दागिन्यांची पारंपारिक मागणी या वाढीला आणखी पाठबळ देत आहे. अमेरिकी सरकारच्या व्यापारशुल्क धोरणांमुळे सुरक्षित आश्रयस्थान असलेल्या मालमत्तांकडे वळण्यास आणखी चालना मिळाली आहे. धोरणात्मक अनिश्चितता, जागतिक संघर्ष, मध्यवर्ती बँकाकडून जोरदार खरेदी आणि भारत व चीनमधील किरकोळ व्याजदरामुळे सोन्याच्या मागणीतील हा संरचनात्मक बदल यापुढेही सुरू राहू शकतो, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
दीर्घकालीन दृष्टीकोन असलेल्या गुंतवणूकदारांसाठी सोन्याशी संबंधित मालमत्ता या नेहमीच योग्य पर्याय ठरलेल्या आहेत. अल्प कालावधीतील अस्थिरतेवर मात करण्यासाठी एसआयपीची सर्वाधिक प्रमाणात शिफारस केली जाते. इंडेक्स फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंडस् (इटीएफ) आणि फंड ऑफ फंडस् आदींचा समावेश असलेले गोल्ड फंडस् अस्थिरतेच्या वेळी पोर्टफोलिओला स्थिरता प्रदान करु शकतात. तसेच चलनवाढीविरोधात एक सुरक्षाकवच म्हणूनही काम करु शकतात.
जागतिक अनिश्चितता, केंद्रीय बँकांच्या खरेदीमुळे सोने दरात वाढ
स्थिरतेचा आणि चलनवाढीपासून बचावाचा दीर्घकालीन गुंतवणूकदारांना लाभ
दरातील अस्थिरतता हाताळण्यासाठी एसआयपी हा उत्तम पर्याय आहे
सोने ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे.
गुंतवणूकदार आपली जोखीम क्षमता, गुंतवणूकीचा कालावधी आणि वित्तीय उद्दीष्ट यांना अनुसरून वैविध्यपुर्ण पोर्टफोलिओ राखू शकतात. समतोलासाठी पोर्टफोलिओचे वेळोवेळी पुनरावलोकन करणे अतिशय गरजेचे आहे. सोने हा सामान्यतः दीर्घकालीन गुंतवणूक मालमत्ता प्रकार मानला जातो आणि त्यानुसारच त्याच्यात गुंतवणूक केली पाहिजे.
गुरविंदर सिंग वासन, वरिष्ठ निधी व्यवस्थापक, बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंड, नाशिक.